वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणारा माथेफिरू गजाआड, मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने बांधल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 02:12 IST2026-02-14T02:10:26+5:302026-02-14T02:12:03+5:30

जगन अर्जून भाले (वय ३७) असे आरोपीचे नाव असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला मुंब्रा येथून आज १२ फेब्रुवारीला अटक केली...

The man who released a snake in the Vande Bharat Express was arrested, the RPF team of the Central Railway made fun of him | वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणारा माथेफिरू गजाआड, मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने बांधल्या मुसक्या

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणारा माथेफिरू गजाआड, मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने बांधल्या मुसक्या

नागपूर : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडून प्रवाशांसह रेल्वे प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या माथेफिरूचा अखेर तब्बल दीड महिन्यानंतर छडा लागला. जगन अर्जून भाले (वय ३७) असे आरोपीचे नाव असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला मुंब्रा येथून आज १२ फेब्रुवारीला अटक केली.

प्रवाशीच नव्हे तर रेल्वे प्रशासनाला हादरवून सोडणारी ही घटना २७ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. सीएसएमटी-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या ट्रेन नंबर २२२२५च्या कोच नंबर सी-१६ च्या शौचालयात एक साप आढळला होता. माहिती कळताच रेल्वेची अख्खी यंत्रणाच सापाला पकडण्यासाठी कामी लागली होती. अखेर सोलापूर स्थानकावर साप ट्रेनच्या बाहेर काढण्यात यश आले होते. साप ट्रेनमध्ये पोहचलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रेल्वे यंत्रणांनी तपास सुरू केला.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून साप ट्रेनमध्ये शिरला नाही तर त्याला एका माथेफिरून ट्रेनमध्ये आणून सोडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५(ब), १४७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला जाऊ लागला. तब्बल दीड महिन्याच्या तपासानंतर मध्य रेल्वेच्या आरपीएफला लिड मिळाली आणि त्या आधारे आज मुंब्रा येथे आरोपी जगन अर्जुन भाले याला अटक केली. चौकशीदरम्यान तो नाशिकचा रहिवासी असून, विकृत वृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्ह्याची कबुली, १४ दिवसांची कोठडी -
आरोपी जगन भाले याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कल्याण रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची दंडाधिकारी कोठडी (एमसीआर) दिल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने आज दिली आहे.
 

Web Title: The man who released a snake in the Vande Bharat Express was arrested, the RPF team of the Central Railway made fun of him