नागपूर : मेंदूचे आरोग्य ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जी जन्मापूर्वीच सुरू होते आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहते. गर्भाशयात निरोगी मेंदूच्या वाढीसाठी आईचे शारीरिक आणि भावनिक आरोग्य महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रसवपूर्व काळजी, योग्य पोषण आणि ताण व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते, असे मत जागतिक न्यूरोलॉजी फेडरेशनचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.
जागतिक न्यूरोलॉजी फेडरेशन १२ वा जागतिक मेंदू दिन साजरा करताना डॉ. मेश्राम बोलत होते. या वर्षाची संकल्पना ‘सर्व वयोगटांसाठी मेंदूचे आरोग्य’ ही आहे. याच्या जनजागृतीसाठी इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी आणि नागपूर न्यूरो सोसायटी उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. मेंदुरोगतज्ज्ञाच्या अपुऱ्या संख्येमुळे जगातील ७० टक्के न्यूरोलॉजिकल आजार विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये आढळतात. महत्त्वाचे म्हणजे २५ टक्के अपस्माराचे झटके, ४० टक्के स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश (डिमेशिया) टाळता येण्यासारखे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मेंदूचे आरोग्य जपणे आयुष्यभराची जबाबदारीडॉ. मेश्राम यांनी सांगितले, गर्भधारणेपूर्वी पालकांचे आरोग्य आणि सवयी बाळाच्या भविष्यातील मेंदूच्या विकासाला आकार देतात. चांगले पोषण, नियमित तपासणी आणि संतुलित जीवनशैली एक मजबूत पाया घालतात. जन्माच्या वेळी श्वास कोंडणे आणि डोक्याला दुखापत टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीची वर्षे शिकण्यासाठी, भावनिक वाढीसाठी आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाची असतात. सुरक्षित वातावरण, लसीकरण आणि सकारात्मक पालकत्व हे आयुष्यभर मेंदूच्या आरोग्यासाठी एक भक्कम पाया तयार करतात.
मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको
मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास विचार करण्याची, शिकण्याची, आठवणीत ठेवण्याची आणि ताणतणाव व्यवस्थापित करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांवर लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तर सुधारतेच, पण सामाजिक आणि आर्थिकवाढीसही चालना मिळते.
न्यूरोलॉजिकल आरोग्य जपण्यासाठी चांगल्या कृतीची गरज
जागतिक न्यूरोलॉजी फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. वोल्फगँग ग्रिसॉल्ड म्हणाले, मेंदूचे आरोग्य हा केवळ एका क्षणाचा विषय नाही, तर आयुष्यभराची वचनबद्धता आहे. गर्भाशयातील विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यांपासून बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्थेपर्यंत न्यूरोलॉजिकल आरोग्य जपण्यासाठी चांगल्या कृतीची गरज असते. डॉ. प्रा. टिसा विजेरत्ने यांनी सांगितले, तुमचे वय कितीही असो किंवा तुम्ही कुठेही राहात असाल, तरी निरोगी मेंदूला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब, लठ्ठपणा मेंदूच्या आरोग्यास धोकादायकपॅन अरब युनियन ऑफ न्यूरोलॉजिकल सायन्सेसचे माजी अध्यक्ष डॉ. प्रा. युसेफ अल-सैद यांच्या मते, अरब प्रदेशात मेंदूच्या आजारांमध्ये स्ट्रोक, मायग्रेन आणि डिमेन्शिया ही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे एका वर्षात ४ लाख ४१ हजार मृत्यू झाले आहेत. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चयापचय समस्या या मेंदूच्या आरोग्यासाठी प्रमुख जोखीम घटक आहेत.