आधीच परीक्षा उशिरा त्यात.. महापालिका निवडणुकीचा नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:46 IST2025-12-16T15:41:55+5:302025-12-16T15:46:36+5:30
Nagpur : आधीच रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला महापालिका निवडणुकीचा फटका बसणार आहे.

The exams are already late.. Municipal elections hit Nagpur University students hard
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधीच रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला महापालिका निवडणुकीचा फटका बसणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली असल्याने १४ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. या काळातील पेपर पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे विद्यापीठाच्या परीक्षा आधीच सुमारे दोन महिने उशिरा होत असताना, आता आणखी ३ ते ४ दिवसांचा विलंबही विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरू शकतो.
यंदा विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या परीक्षा उशिरा घेण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, याची आधीच शक्यता होती. मात्र, त्या जानेवारीतच होतील की नाही, हे निश्चित नव्हते. जानेवारीत न झाल्यास त्या एप्रिल-मे महिन्यात होणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात बँक विषयांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. आता नियमित परीक्षाही सुरू होणार असल्याने अनेक विषयांचे बँक पेपर आणि नियमित पेपर एकाच दिवशी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढे आणखी अडचणी वाढू शकतात. दरम्यान, मनपा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच विद्यापीठ प्रशासनाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच निवडणूक कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर अध्यापन व अशैक्षणिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार असल्याने हे वेळापत्रक बदलण्यात येत आहे. यापूर्वीच विद्यार्थ्यांनी १४ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यास आक्षेप नोंदवला होता.
कारण त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. मनपा निवडणुका शाळा व महाविद्यालयांमध्ये घेतल्या जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. यात विद्यापीठासह अनुदानित व महाविद्यालयांतील कर्मचारी अधिकाऱ्यांची निवडणूक ड्यूटी लागणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १४ जानेवारीपासून केंद्रांवर कर्मचारी हजर राहतील आणि १६ जानेवारीपर्यंत ते निवडणूक कामकाजात गुंतलेले राहतील. त्यामुळे या तीन दिवसांतील परीक्षांच्या तारखा बदलणे अपरिहार्य ठरणार आहे. नियमित सेमिस्टरच्या परीक्षा २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, तर पदव्युत्तर परीक्षांना १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. डिसेंबरमधील परीक्षांवर याचा परिणाम होणार नाही; मात्र जानेवारीतील परीक्षा बदलाव्या लागतील. नियमित आणि बॅकलॉग परीक्षा एकमेकांवर ओव्हरलॅप होणार नाहीत, असा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केला जाणार आहे. मात्र, हे काम आव्हानात्मक ठरणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे.