शिक्षण विभागाचा दरवर्षीचा गोंधळ ! ‘पॅट’च्या प्रश्नपत्रिका यावर्षीही कमी पाठवल्या, परीक्षा कशी घ्यावी?
By निशांत वानखेडे | Updated: October 9, 2025 19:15 IST2025-10-09T19:14:09+5:302025-10-09T19:15:15+5:30
प्रत्येक शाळेत चार-पाच ते २० पर्यंत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा : आजपासून परिक्षा कशी घ्यावी, शाळांसमोर प्रश्न

The Education Department's annual confusion! Fewer 'PAT' question papers were sent this year as well, how to take the exam?
नागपूर : समग्र शिक्षा प्रकल्पाअंतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलीत मुल्यमापन चाचणी १ (पॅट)चे आयोजन १० ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. मात्र शिक्षण विभागाने यावर्षीही ताेच गाेंधळ घातला आहे. यावेळीही विभागाने कमी प्रश्नपत्रिका पाठविल्याने तुटवडा पडणार असून परीक्षा कशी घ्यावी, हा प्रश्न शाळांसमाेर आहे.
समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मुल्यांकन चाचणी (पॅट) मधील संकलीत मुल्यमापन चाचणी १ (पॅट-१) चे आयोजन १० ते १३ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची ही चाचणी असून यामध्ये प्रथम भाषा, गणित व तृतिय भाषा इंग्रजी या विषयाची परीक्षा हाेणार आहे. चाचणीच्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेमार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येत आहेत. यु-डायस प्रणालीत झालेल्या नाेंदणी नुसार जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ७६३ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. एवढ्या प्रश्नपत्रिका येणे गरजेचे हाेते. मात्र परिषदेने अपुऱ्या प्रश्नपत्रिका पाठविल्याच्या प्रचंड तक्रारी समाेर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक शाळांमध्ये कुठे चार, पाच तर कुठे २० पर्यंत प्रश्नपत्रिका कमी आल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांना स्वत: खर्च करून झेराॅक्स काढाव्या लागणार आहेत. मात्र गाेपनीयतेचा विचार करता प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्यात येऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा कशी घ्यावी, हा प्रश्न शिक्षक व शाळांसमाेर पडला आहे.
"समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत राज्यात एकाच वेळी इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या संकलित चाचणी १(पॅट)चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा करण्यात आले परंतु दुर्दैवाने दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा चाचणीच्या प्रश्नपत्रिका पुरेशा मिळाल्या नाहीत, अशावेळी परिक्षा कशा घ्याव्यात हा पेच शाळांपुढे निर्माण झाला आहे."
- धनराज बोडे, जिल्हा अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर