Ativrushti Nuksan Bharpai : पीक गेलं, घर गेलं अजून काय पाहायचं उरलं.. शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण अजून पाहणी संपेना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:02 IST2025-09-30T15:58:44+5:302025-09-30T16:02:08+5:30
Nagpur : सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

The crop is gone, the house is gone, what else is left to see? Farmers need help, but the inspection is not over yet!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने २९ हजार ९७१ हेक्टरमधील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या डोळ्यांत अश्रू आहे. शासनाकडून तातडीची मदत मिळावी, यासाठी टाहो फोडत आहे.
शासन पातळीवर अद्याप सर्वेचे काम सुरू आहे. पदाधिकारी, मंत्री यांचे नुकसानग्रस्त भागात दौरे सुरू आहेत. परंतु, मदत कधी व किती मिळणार असा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. संत्रा व मोसंबी पिकाला काही भागात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आंबियाचा संत्रा खाली पडला आहे. आस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सावनेर तालुक्यात केळवद सर्कल मधील सालई, नांदागोमुख, उमरी (भ) आणि छत्रापूर या चार गावांत सर्वाधिक नुकसान झाले. काटोल तालुक्यातील सोनोली नंदारीटी, पार्टी रीठी, तपणी, वाई, चंदकापूर, माळेगाव, झिल्पा येनवा, सावळी, बोरगाव रिठी, राऊळगाव आणि डोंगरगाव या भागांतील संत्रा मोसंबीच्या झाडांवरील फळे गळून पडत आहेत. सोबतच सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
जुलै महिन्यात जिल्ह्यातील ६ हजार १२८ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान होते. या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नसतानाच सप्टेंबरमध्ये २९ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाला येलो मोडॉकचा फटका बसला आहे.
काही दिवसांत घरात येणारे पीक बुडाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार मात्र जिल्ह्यात ३ हजार १७४ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले असून, यामुळे ४ हजार शेतकरी बाधित झाले आहे. वास्तविक नुकसानीचा आकडा आता अतिवृष्टीमुळे त्याच लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त होत आहे, तो सावरण्यासाठी सरकारने तत्काळ हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
संत्र्याला एक लाख तर सोयाबीनला ५० हजार द्या
संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, म्हणून शासनाने हेक्टरी एक लाख तर सोयाबीनला हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तरच, शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी आनंदात जाईल.
५० हजार हेक्टर पिकाचे नुकसान
जिल्ह्यात २९ हजार ९७१ हेक्टरमधील सोयाबीन, ११ हजार १७२ हेक्टर संत्रा व ८ हजार ७९२ हेक्टरवरील मोसंबी फळबागांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीमुळे कपाशीचे किती नुकसान 3 झाले याची माहिती गोळा केली जात आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे सुरू आहे. मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असून, अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
पावसामुळे बाधित सोयाबीन क्षेत्र
एकूण क्षेत्र - ७८,६००
बाधित क्षेत्र - २९,९७१
बाधित गावे - ९४६
बाधित शेतकरी - ४३,३९७
"लाडक्या बहिणींना मदत केली. सोयाबीन हातून गेलाच पराटीची पानगळ सुरू आहे. संत्र्याचा दहा टन माल शेतात होता, हा तरी यंदाच्या वर्षी साथ देईल, अशा अपेक्षेने होतो. मात्र, सततच्या पावसाने तीन टनवर माल दिसत नाही. किमान शासनाकडून संत्रा-मोसंबीची तरी नुकसानभरपाई अपेक्षित आहे."
- रोशन झळके
"झाडावरच फळे गळून पडत असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल."
- चंद्रकांत महाजन, माजी सरपंच, सोनोली.