"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:34 IST2025-10-29T19:31:21+5:302025-10-29T19:34:33+5:30
Ajit Navale Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रस्त्यावर बसले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बच्चू कडूंसह सर्वच शेतकरी नेते आक्रमक झाले.

"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
Bacchu Kadu Morcha Nagpur: "भावानो कालचं माझं भाषण रेकॉर्डवर आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. दगाफटका होऊ शकतो याची चुणूक काल मी तुम्हाला माझ्या भाषणात सांगितली होती. हे बरोबर न्यायालयाला पुढे करतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीचं मुंबईतील एक आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनासाठी वापरतील अशी शंका आम्हाला काल होती. आज कोर्टाचे आदेश आले. ती शंका खरी ठरलेली आपल्याला दिसत आहे", असे सांगत शेतकरी नेते अजित नवले यांनी महायुती सरकार गंभीर आरोप केला. आता जेलमध्ये जाणार पण माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाचा आदेश आल्यानंतर आंदोलन स्थळी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना अजित नवले म्हणाले, "भावानो, ही लढाई जर आपण आता सोडली, आपण जर इथे चूक केली, तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये लढा उभा राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हा पॅटर्न बनले की, लोकांनी लढावं. संघर्ष करावा आणि सरकारच्या अंगलट आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी. आपले लोकशाही अधिकार, हे मातीत गाडावे. हे जर आता आपण सहन केलं, तर यापुढे कोणतेही आंदोलन उभे राहणार नाही."
'जे जरांगेंच्या आंदोलनात झाले, तेच आज...'
"जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झाले. आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे. तेच उद्या तुमच्या, आमच्या आणि प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहेच पण त्याचबरोबर हा लोकशाही वाचवण्याचा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे", असे अजित नवले म्हणाले.
अजित नवले न्यायालयाच्या आदेशाबद्दल म्हणाले, "न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयाचा अवमान करायचा नाहीये. आम्ही कुणीच न्यायालयाचा अवमान करणार नाहीये. अर्थात ज्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तो शेतकऱ्याचा अवमान झाला, तो चालतो. माता-भगिनी विधवा झाल्या तरी चालतं. न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे. शांतता पाळायची आहे. पण, लढ्यातून माघार घ्यायची नाही."
पोलिसांनी गाड्या आणाव्यात...
"न्यायालयाचा अवमान करायचा नाही आणि लढा सुद्धा सोडायचा नाही. पोलिसांना आवाहन आहे. गाड्या बोलवा. आमची शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जायला तयार आहेत. जेलभरो जो होईल, तो नाटकी जेलभरो होता कामा नये. आपल्यापैकी कुणीही जामीन स्वीकारणार नाही. लुटूपुटूची लढाई करायची नाही. जेलमध्ये जायचे म्हणजे जायचे. माघार घ्यायची नाही", असा इशारा अजित नवलेंनी सरकारला दिला.