सिरप कंपनीच्या मालकाला केले अटक ! आतापर्यंत एकूण २५ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:59 IST2025-10-11T15:56:31+5:302025-10-11T15:59:59+5:30
Nagpur : कफ सिरप मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी' ने रंगनाथनला चेन्नईत अटक केली. शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता एसआयटीचे पथक रंगनाथनला घेऊन नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.

Syrup company owner arrested! Total 25 children have died so far
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विषारी कफ सिरपमुळे छिंदवाडा, बैतुल आणि पांढुर्णा या भागातील आतापर्यंत एकूण २५ मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला अखेर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. रंगनाथनला चेन्नई येथून अटक केल्यानंतर, पुढील कारवाईसाठी नागपूरमार्गे छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथे नेण्यात आले.
कफ सिरप मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी' ने रंगनाथनला चेन्नईत अटक केली. शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजता एसआयटीचे पथक रंगनाथनला घेऊन नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ७.१० वाजता एसआयटी रंगनाथनला घेऊन विमानतळाच्या बाहेर पडले.
त्यानंतर, एसआयटीच्या दोन गाड्या तातडीने छिंदवाडाकडे रवाना झाल्या. प्राप्त माहितीनुसार, एसआयटीचे पथक सकाळी ९.१५ वाजता महाराष्ट्राची सीमा ओलांडून सतनुर टोल नाका पार करून मध्यप्रदेशात दाखल झाले. रंगनाथनला सर्वप्रथम परासिया पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रंगनाथनला पुढील चौकशीसाठी १० दिवसांची पोलिस रिमांड दिली आहे.