'महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:11 IST2025-10-01T16:09:27+5:302025-10-01T16:11:45+5:30
Nagpur : संविधान सत्याग्रह पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम खडकीत

'Surrendering to Mahatma Gandhi is an ideological defeat for the Sangh', Congress state president Harshvardhan Sapkal criticized
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सुरु नागपूरच्या दीक्षाभूमीपासून झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी बुटीबोरी येथून सकाळी ६.३० वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. दुपारी सावंगी येथे विश्रांती घेण्यात आली व रात्रीचा मुक्काम खडकीला करण्यात आला. या पदयात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, माजी मंत्री वसंत पुरके, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोयर, सरचिटणीस कुंदा राऊत, मुजीब पठाण, संदेश सिंगलकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
यावेळी सपकाळ म्हणाले, आज भाजपा सत्तेत आला आहे पण महात्मा गांधी नावाचा संत भाजपा व आरएसएसच्या मानगुटीवर बसलेला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आलेला असून भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्वीकारावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. पण रा. स्व. संघाकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
गांधी भजन व देशभक्तीची गाणी
पदयात्रेत म. गांधी यांची भजने व देशभक्तीची गाणी वाजविण्यात आली. यात्रेत सहभागी प्रत्येक जण भारत माता की जय, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देत होते.