लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी हजारो विद्यार्थ्यांनी 'कॅरी ऑन'च्या मागणीसाठी आंदोलन केले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठाने परीक्षेसाठी अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याबाबत परिपत्रक न काढल्याने या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. २०२४-२५ सत्रासाठी एटीकेटीनुसार निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठाने २९ ऑगस्ट २०२४ रोजी एक परिपत्रक जारी करून परीक्षेसाठी अतिरिक्त संधी दिली. मात्र, यावर्षी असे कोणतेही परिपत्रक विद्यापीठाने काढले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची चिंता असून हजारो विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठात कॅरी ऑन योजनेसाठी अर्ज करत आहेत.
या संदर्भात छत्रपती शिवाजी विद्यार्थी संघाचे मोहनीश जबलपुरे आणि रोशन कुंभलकर यांच्या नेतृत्वात संघटनेने २४ एप्रिल २०२५ आणि ५ जून रोजी कुलगुरू माधवी खोडे चावरे यांना निवेदन सादर केले. निवेदनात विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून कॅरी ऑन लागू करण्याचे आवाहन करण्यात आले. कुलगुरूंनी त्यावेळी आश्वासन दिले होते. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंसह प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांना निवेदन देऊन त्यांच्या समस्येची जाणीव करून दिली आहे. अलीकडेच अमरावती विद्यापीठातही विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन लागू करण्यात आले. विद्यापीठाने लवकरच परिपत्रक जारी करून कॅरी ऑन लागू करण्याचा निर्णय घेतला नाही, तर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोहनीश जबलपुरे यांनी दिला.