हप्ता न देणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण

By Admin | Updated: April 7, 2016 03:10 IST2016-04-07T03:10:43+5:302016-04-07T03:10:43+5:30

उत्तर नागपुरातील वादातीत संघटनेशी संबंधित गुन्हेगाराने जनरेटर भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीला हप्ता न दिल्यामुळे मारहाण केली.

Striking a non-premium businessman | हप्ता न देणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण

हप्ता न देणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण

उत्तर नागपुरात गुन्हेगारांची दहशत :
२० हजार रुपयाचा मागितला हप्ता

नागपूर : उत्तर नागपुरातील वादातीत संघटनेशी संबंधित गुन्हेगाराने जनरेटर भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीला हप्ता न दिल्यामुळे मारहाण केली. ही घटना जरीपटका येथील मंगळवारी बाजारात घडली.
मनोज बन्सोड आणि त्याचा साथीदार अशी आरोपीची नावे आहे. विनोबा भावेनगर येथील राजेश बिजेकर (३२) हा आठवडी बाजारात जनरेटरने दुकानदारांना वीज पुरवठा करण्याचे काम करतो. मंगळवारी जरीपटका येथे आठवडी बाजार भरतो. दुपारी ४ वाजता राजेश नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता. यादरम्यान मनोज बन्सोड आपल्या साथीदारासोबत आला. त्याने राजेशला २० हजार रुपयाची मागणी केली. नकार दिल्याने मारहाण करीत हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे बाजारात तणाव निर्माण झाला. दुकानदार आपले दुकान बंद करू लागले. यापूर्वीसुद्धा हप्ता न दिल्यामुळे धमकी मिळत असल्याने त्रस्त राजेशने जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मनोज बन्सोडच्या विरुद्ध हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा दंगा, मारहाण आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्याची दहशत आहे. तो गेल्या काही दिवसांपासून उत्तर नागपुरातील एका संघटनेशी जुळलेला आहे. पोलीस गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोका व एमपीडीएची कारवाई करीत आहे. परंतु तरीही गुन्हेगार दिवसाढवळ्या हप्ता वसुली करीत आहेत. मनोज व त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले नसल्याने राजेश दहशतीत आहे. (प्रतिनिधी)

वर्गणीच्या नावावर वसुली
गुन्हेगारी प्रवृत्तीची ही मंडळी आठवडी बाजार व परिसरात वर्गणीच्या नावावर हप्ता वसुली करीत आहे. न देणाऱ्याला धमकी दिली जात आहे. या गुन्हेगारांमुळे आठवडी बाजारातील भाजीविक्रेते, पातठेले आणि फुटपाथ विक्रेते त्रस्त झाले आहेत.

Web Title: Striking a non-premium businessman