संपाचा फटका, लसीकरण बंद; बीपी, शुगरची औषधीही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 03:02 PM2023-11-21T15:02:34+5:302023-11-21T15:03:07+5:30

एनयूएचएमचे ६७२ कर्मचारी संपावर : मनपाच्या ४० यूपीएचसीचे कामकाज ठप्प, तरीही मनपाचा आरोग्य विभाग निवांत

Strikes hit, vaccinations stopped; BP, sugar medicine is not available | संपाचा फटका, लसीकरण बंद; बीपी, शुगरची औषधीही मिळेना

संपाचा फटका, लसीकरण बंद; बीपी, शुगरची औषधीही मिळेना

नागपूर : आरोग्य विभागात १८ ते २० वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी २८ दिवसांपासून संपावर आहेत. मनपाच्या आरोग्य यंत्रणेत एनयूएचएम (नॅशनल अर्बन हेल्ट मिशन) च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ८० टक्के वाटा आहे. त्याचा परिणाम मनपाच्या आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. मनपाच्या ४८ यूपीएचसी (अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर) पैकी ४० यूपीएचसीचे कामकाज ठप्प पडले आहे. या संपात मनपात कार्यरत एनयूएचएमचे ६७२ कर्मचारी सहभागी आहेत.

आरोग्य सेवा हा जनतेशी निगडित आणि अत्यंत संवेदनशील विभाग आहे. यात १८ ते २० वर्षांपासून एनयूएचएम अंतर्गत महापालिकेत डॉक्टर, फार्मासिस्ट, जीएनएम, एएनएम, अकाउंटंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेंडंट आदी पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शासकीय पदभरती बंद असल्याने आरोग्य यंत्रणेचा भार याच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कायम करण्याच्या संदर्भातील विषय अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत काम करणारे ही सर्व कंत्राटी मंडळी काम बंद करून आंदोलनात सहभागी झाली आहेत. त्यामुळे यूपीएचसीतील ओपीडी, बालकांचे लसीकरण, गरोदर महिलांचे लसीकरण, केंद्र सरकारचा आयुष्मान भव सारखे अभियान, कुष्ठरोग क्षयरोग शोध मोहीम, टेलिमेडिसिन आदी उपक्रम ठप्प पडले आहेत. यूपीएचसीमध्ये नागरिकांना नि:शुल्क मिळणाऱ्या शुगर आणि बीपीची औषधी मिळणे बंद झाले आहे. डॉक्टरच संपावर असल्याने नागरिकांच्या आरोग्याची तपासणी बंद आहे. याशिवाय या अभियानात काम करणाऱ्यांना शासनाकडे दररोजचा जो अहवाल पाठवावा लागतो, तो अहवालही फेक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

- राज्याच्या आरोग्य विभागात परमानंट कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २५ ते ३० टक्के आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग तर केवळ एनयूएचएम कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच आहे. कोरोना काळात आमच्या कर्मचाऱ्यांनी जे काम केले त्या बळावर मनपाची आरोग्य यंत्रणा शाबूत राहिली. आज महिना होत आहे, मनपाच्या यूपीएचसीचे कामकाज ठप्प आहे; पण मनपाच्या यंत्रणेला त्याची काळजी नाही, ही शोकांतिका आहे.

- डॉ. भोजराज पडवे, सदस्य, राष्ट्रीय आरोग्या अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचारी समायोजन कृती समिती

आम्ही यूपीएचसीमध्ये जीएनएम म्हणून काम करतो. आमच्या यूपीएचएसींतर्गत येणाऱ्या प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो. मुलांचे लसीकरण, गरोधर मातेचे लसीकरण आणि सरकारचे अभियानही राबवितो. यूपीएचसीत कर्मचारीच नसल्याने बंद असल्यामुळे लोकांचे फोन येत आहे.

- सुनीता डोंगरे, ममता रंगारी, जीएनएम

Web Title: Strikes hit, vaccinations stopped; BP, sugar medicine is not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.