खेळताना हटकले म्हणून हल्ला

By Admin | Updated: June 3, 2017 01:50 IST2017-06-03T01:50:13+5:302017-06-03T01:50:13+5:30

क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली शिवीगाळ करीत गोंधळ घालणाऱ्या मुलांना हटकले म्हणून मुलांच्या

Strike as if hit play | खेळताना हटकले म्हणून हल्ला

खेळताना हटकले म्हणून हल्ला

गोधनी रोडवरील घटना : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेट खेळण्याच्या नावाखाली शिवीगाळ करीत गोंधळ घालणाऱ्या मुलांना हटकले म्हणून मुलांच्या नातेवाईकांनी हटकणाऱ्याच्या घरावर हल्ला चढवला. घराचे दार तोडून आतमध्ये शिरलेल्या हल्लेखोरांनी एका कुटुंबातील महिला-पुरुषांना बेदम मारहाण केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली.
गोधनी मार्गावर दर्शना सोसायटी असून, येथे किरण सुदाम भानावत (वय ३०) राहतात. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांच्या घरासमोर काही मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना ही मुले अश्लील हातवारे करून घाणेरड्या शिव्या देत होती. त्यामुळे किरण यांनी त्या मुलांना हटकले. चांगले खेळा, शिव्या देऊ नका, असा सल्लाही दिला. त्यावरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी किरण यांच्यासोबत वाद घातला. बाचाबाची केल्यानंतर पाहून घेण्याची धमकी देऊन मुले निघून गेली.
त्यानंतर रात्री ९.४५ वाजता आरोपी नागेश पवार (वय २८), शिवधन पवार (वय २३), ललिताबाई पवार (वय ४७), ज्योती विक्की राठोड (वय २६), विक्की राठोड (वय ३०) आणि त्यांचा एक साथीदार किरण यांच्या घरावर चालून आले. ते हल्ला करणार असल्याचे लक्षात आल्यामुळे किरण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घराचे दार लावून घेतले असता आरोपींनी दारावर लाथा मारून कोंडा तोडला.
घरात शिरून हल्लेखोरांनी किरण, किरण यांची आई, पत्नी तसेच वहिनींना अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. पुन्हा आमच्या मुलांना हटकले तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले.

परिसरात तणाव
या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. आजूबाजूची मंडळी मोठ्या संख्येत जमा झाल्याने प्रकरण भलत्याच वळणावर जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, काही लोकांनी समंजसपणा दाखवल्यामुळे पुढची घटना टळली. दरम्यान, किरण यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक झाली की नाही, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.

 

Web Title: Strike as if hit play