"काँग्रेसची बदनामी थांबवा, अन्यथा गौप्यस्फोट करेन"; नाना पटोलेंचा मित्रपक्षांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:53 IST2026-04-06T14:51:55+5:302026-04-06T14:53:25+5:30
Nagpur: राज्यातील राजकारण सध्या विविध पोटनिवडणुका आणि अंतर्गत कलहामुळे तापलेले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मित्रपक्षांवर घणाघाती टीका केली आहे.

"Stop defaming Congress, otherwise I will expose you"; Nana Patole's direct warning to allies
नागपूर : राज्यातील राजकारण सध्या विविध पोटनिवडणुका आणि अंतर्गत कलहामुळे तापलेले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मित्रपक्षांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना पटोले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, जर काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तर मी सर्व सत्य समोर आणून पर्दाफाश करेन,असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
‘सामना’च्या टीकेवर पटोले आक्रमक: "कुणाच्या दबावाखाली होता?
'सामना'मधील अग्रलेखातून होणाऱ्या टीकेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मला यावर भाष्य करायचे नव्हते, पण वारंवार काँग्रेसची बदनामी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसचा अध्यक्ष कुणाच्या दबावाखाली होऊ दिला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. हायकमांडची परवानगी घेऊन मी त्या सर्व घडामोडींचा पर्दाफाश करेन, ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका.
"राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार"
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, "पुढच्या काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल. भाजप आपल्याच मित्रपक्षांना संपवण्याचा कट रचत आहे. केवळ निधीच नाही, तर राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम सुरू आहे. 'अशोक खरात फाईल्स'मधून अनेक गोष्टी समोर येतील. सत्तेतील काही लोक मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा 'गेम' कसा होतो हे लवकरच दिसेल.
बारामती आणि राहुरी: हे तर राजकीय युद्ध
बारामती पोटनिवडणुकीवर बोलताना पटोले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे संकेत दिले. "हायकमांडने बारामती लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक युद्ध आहे आणि युद्धात काय होते ते १३ तारखेला (अर्ज माघारीच्या दिवशी) स्पष्ट होईल. मित्रपक्ष काँग्रेसला वारंवार डिवचत असले तरी आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
गडकरी आणि नितेश राणेंवर निशाणा
नितीन गडकरींच्या विधानांचा समाचार घेताना पटोले म्हणाले, गडकरी साहेबांबद्दल मला आदर आहे, पण त्यांनी इतिहासातील ब्राह्मण व्यवस्थेने ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांना दिलेल्या त्रासावरही बोलावे. ती व्यवस्था आजही संपलेली नाही. दरम्यान, नितेश राणे यांच्या धार्मिक विधानांवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले की, अशा चिथावणीखोर मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवणे सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे.
प्रफुल पटेलांबाबत सहानुभूती
अजित पवार गटातील अंतर्गत वादावर बोलताना पटोले यांनी प्रफुल पटेल यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. "प्रफुल पटेल यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारण सांभाळले आहे. त्यांच्यावर जर पक्षात अन्याय होत असेल, तर ते पाहून आम्हालाही वाईट वाटते, असे सूचक विधान त्यांनी केले.