केंद्रीय विज्ञान मंत्र्यांच्या ‘आयआयटी’च्या नावात ‘बॉम्बे’ कायम ठेवल्यामुळे ‘खूश’ असल्याच्या वक्तव्यावर राज्य सरकार नाराज
By योगेश पांडे | Updated: December 13, 2025 14:48 IST2025-12-13T14:41:07+5:302025-12-13T14:48:41+5:30
आशीष शेलार : मुख्यमंत्र्यांकडून केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार

State government unhappy with Union Science Minister's statement regarding 'IIT'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील ‘आयआयटी’बाबत केलेल्या वक्तव्याशी राज्य शासन सहमत नाही. ‘आयआयटी’च्या नावात ‘बॉम्बे’ शब्द कायम ठेवल्यामुळे ‘खूश’ असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावर राज्य सरकार नाखूश आहे असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी केले. विधानपरिषदेत अनिल परब यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या संबंधित वक्तव्याबाबत नियम ९३ अन्वये सूचना उपस्थित केली होती. त्याच्या निवेदनावर बोलताना शेलार यांनी सरकारची भूमिका मांडली.
आयआयटी बॉम्बेच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले, त्याचे मुंबई केले नाही, हे चांगलेच झाले असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नोव्हेंबर महिन्यात केले होते. परब यांनी हा मुद्दा उपस्थित करत हा राज्याच्या अस्मितेवर प्रहार असल्याचा आरोप केला. बॉम्बे नाव हटवून मुंबई करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, राम नाईक यांच्यासह अनेकांनी संघर्ष केला. शिवसेना, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मार खाल्ला व त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. हा राज्याच्या अस्मितेचा विषय आहे, असे परब म्हणाले. यावर बोलताना शेलार यांनी शासनाची भूमिका बॉम्बे नसून मुंबई हीच असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी डॉ.सिंह यांच्य वक्तव्यासंदर्भात वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांना अधिकृत पत्रदेखील पाठविले आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.