महायुती व महाविकास आघाडीत फूट ! शिंदेसेनेचे भाजपला १३ ठिकाणी थेट आव्हान; राष्ट्रवादी (श प) नेही दिले काँग्रेसविरोधात उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:31 IST2025-11-22T13:29:16+5:302025-11-22T13:31:35+5:30
Nagpur : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे.

Split in Mahayuti and Mahavikas Aghadi! Shinde Sena directly challenges BJP in 13 seats; NCP (SP) also fielded candidates against Congress
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे. तर नरखेडमध्ये भाजप विरोधातील आघाडीला पाठबळ दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष ९ जागा लढत असून यापैकी ७ शहरात काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले आहेत.
रामटेकमध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाजपला तगडी टक्कर देण्याची तयारी केली आहे. येथे शिंदेसेनेकडून विकेंद्र महाजन रिंगणात आहेत. खाप्यात भाजपचे बंडखोर खेमराज बारापात्रे यांना शिंदेसेनेने गळाला लावत उमेदवारी दिली आहे. शिंदेसेनेने कळमेश्वरात बिरजू रघुवंशी यांना, वर्दराज पिल्ले (कन्हान पिपरी), दुर्गा नरेश देवगडे, (वानाडोंगरी) शालिनी सोनटक्के (उमरेड) रवी त्रिपाठी (वाडी), प्रकाश हुमने (बिडगाव तरोडी), सुनीता प्रकाश डोमकी (पारशिवनी), संगीता रघुनाथ गायकवाड (बहादुरा), मंगला डडमल (भिवापूर), प्रीती प्रकाश आजादे (गोधनी) व बेसा येथे स्वाती प्रवीण देठे यांना रिंगणात उतरविले आहे.
नरखेड येथे नगर विकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित गुप्ता यांना काँग्रेस व शिंदेसेनेने मदतीचा हात दिला आहे. यामुळे भाजपचे मनोज कोरडे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. फक्त कांद्री कन्हान येथेच शिंदेसेनेने भाजपसोबत युती केली आहे. येथे भाजपचे सुजित पानतावणे रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष एकूण ९ जागांवर लढत आहे. यापैकी ७ठिकाणी त्यांचा सामना काँग्रेसशी होत आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) मोहप्यात हरिओम नेरकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय वैशाली विकास गणवीर (वानाडोंगरी), शीतल संजय राऊत (कोंढाळी), मृणाल तिघरे (मौदा), माधुरी तुमडाम (भिवापूर), अर्चना प्रवीण मंडपे (महादुला), भारती गोवर्धन प्रधान (नीलडोह) येथे उमेदवार आहेत.
दादांची राष्ट्रवादी ८ शहरांत भाजपविरोधात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ८ शहरांमध्ये स्वबळावर लढत असून या आठही ठिकाणी त्यांनी भाजप विरोधात उमेदवार दिले आहेत. फक्त मौदा नगरपंचायतीमध्ये भाजपला समर्थन दिले आहे. राष्ट्रवादीने (अजित पवार) मोवाड येथे प्रतिभा साहेबराव ढोके यांना उमेदवारी दिली आहे. कन्हान-पिपरीमध्ये भाजप बंडखोर मनोहर पाठक यांनाच प्रवेश देत भाजपला आव्हान दिले आहे. याशिवाय वैशाली गोपाल घटे (सावनेर), सोनाली प्रकाश लारोकर (वानाडोंगरी), संगीता नरेंद्र मेश्राम (डिगडोह देवी), गौरीशंकर रावत (वाडी) व गणेश पानतावणे यांना कांद्री कन्हानमध्ये मैदानात उतरविले आहे.
रामटेकमध्ये उद्धवसेना नाही
उद्धवसेना एकूण ८ शहरांत लढत आहे. यापैकी ६ शहरांत काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. मात्र, रामटेक हा आमचा गड आहे असे वारंवार मुंबईतून सांगणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्षात रामटेक नगरपरिषदेत कुणालाच मशाल घेऊन लढाईत उतरविलेले नाही. शिवाय अद्याप येथे कुणाला पाठिंबाही जाहीर केलेला नाही.