रात्री जीव मुठीत घेऊन बसमध्ये काढले चार तास; चालक-वाहकांची थरारक रात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:24 IST2023-09-24T06:23:38+5:302023-09-24T06:24:59+5:30
तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली.

रात्री जीव मुठीत घेऊन बसमध्ये काढले चार तास; चालक-वाहकांची थरारक रात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीचे २ वाजले होते. विजांच्या कडकडाटाने रेस्टरूममध्ये असलेल्या एसटीच्या चालक वाहकांची झोप उडाली होती. दाराच्या आतमधून पाणी रेस्टरूममध्ये शिरत असल्याचे पाहून एकाने दरवाजा उघडला अन् पाण्याचा लोंढा अचानक आत शिरला. कंबरेपर्यंत पाणी आत आल्याने चालक - वाहकांनी आहे त्या स्थितीत कपडे हातात घेऊन स्थानक परिसरात उभ्या असलेल्या बसमध्ये धाव घेतली. काही वेळानंतर बसच्या खिडक्यांच्या वितभर खाली पाणी आल्याने बसचालक - वाहकांचे जीव टांगणीला लागले होते. तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली.
१२ बसचे चालक वाहक मुक्कामी
पाण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की स्थानकाला तलावाचे स्वरूप आले. यावेळी स्थानकाच्या रेस्ट रूममध्ये १२ एसटी बसेसचे चालक, वाहक मुक्कामी होते. रात्रीचे प्रसंग त्यांच्या काळजात धस्स करणारे होते. बसेस बुडाल्यामुळे अक्षरश: होडीसारख्या हलू लागल्या होत्या. तशी अनेकांच्या काळजाची धडधडही वाढली.
शहराच्या मध्यवर्ती भागात मोरभवन बसस्थानक आहे. या स्थानकाच्या बाजुनेच मोठा नाला वाहतो. बस स्थानकांच्या प्रांगणाचा उतार त्याकडेच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पाऊसामुळे बस स्थानकात नाल्याचे पाणी शिरले.