नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:14 IST2019-07-20T00:14:01+5:302019-07-20T00:14:50+5:30
रस्त्याने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव कारचालकाने मागून धडक मारल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास खरबी मार्गावरील न्यू डायमंड नगरात हा भीषण अपघात घडला.

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्याने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव कारचालकाने मागून धडक मारल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास खरबी मार्गावरील न्यू डायमंड नगरात हा भीषण अपघात घडला. लोकेश प्रेमलाल वट्टी (वय २५) असे मृताचे नाव असून गंभीर जखमी झालेल्याचे नाव देवेंद्र भय्यालाल सोनोने (वय २८) आहे.
वट्टी आणि सोनोने हे दोघे मित्र होत. ते रमणा मारोती नगरात राहत होते. त्यांचा एक मित्र अमन अशोक मेश्राम (वय २५) मनीषनगर, हुडकेश्वरमध्ये राहतो. वट्टी, सोनोने आणि मेश्राम हे तिघे खरबी मार्गावरील चाकोरे कॉम्प्लेक्ससमोर गुरुवारी रात्री बोलत होते. मेश्रामला फोन आल्याने तो बोलत बोलत बाजुला गेला तर वट्टी आणि सोनोने रस्त्याने पुढे निघाले. तेवढ्यात वेगात आलेल्या एका लाल रंगाच्या कारने वट्टी आणि सोनोनेला जोरदार धडक मारली. त्यात लोकेश वट्टीचा मृत्यू झाला. तर, देवेंद्र सोनोने गंभीर जखमी झाला. तिसरा मित्र अमन मेश्राम बाजूला असल्याने बचावला. अमनने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.