बांधकामाला वेग; त्यानंतरही सिमेंट आणि स्टीलचे भाव स्थिर

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 6, 2024 09:58 PM2024-03-06T21:58:28+5:302024-03-06T21:58:41+5:30

- बांधकाम क्षेत्रात भाववाढ नाही : दोन वर्षांत स्टीलचे भाव २० रुपयांनी घसरले

speed of construction; Even after that, cement and steel prices remained stable | बांधकामाला वेग; त्यानंतरही सिमेंट आणि स्टीलचे भाव स्थिर

बांधकामाला वेग; त्यानंतरही सिमेंट आणि स्टीलचे भाव स्थिर

नागपूर: दरवर्षी उन्हाळ्यात बांधकामाचा वेग वाढताच सिमेंट आणि स्टीलचे भाव वाढतात, असा बिल्डरांचा अनुभव आहे. पण यंदा सिमेंटचे भाव स्थिर असून स्टीलचे भाव उतरले आहेत. दोन महिन्यांच्या तुलनेत प्रति किलो ५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. बाजारात ८ ते २५ एमएम स्टीलचे (सळाख) भाव १८ टक्के जीएसटीसह ५५ ते ५७ रुपये किलो आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत स्टीलचे भाव प्रति किलो २० रुपयांनी कमी झाले आहेत. दरकपातीचा ग्राहकांचा फायदा होत आहे.
सिमेंटचे भाव प्रति बॅग ३३० ते ३४० रुपये, तर रेती ५५ ते ६० रुपये फूट विकली जात आहे. डम्परचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने बांधकाम खर्च वाढला आहे. तर विटांचे भाव स्थिर आहेत. मागणी कमी असल्याने भाव बदलेले नाहीत. विटांचे उत्पादन करणाऱ्यांना कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, पुढील हंगामात स्थिती बदलणार असून सध्या मातीच्या एक हजार विटांसाठी ७००० ते ७५०० रुपये मोजावे लागत आहेत.

बांधकामाच्या खर्चावर नियंत्रण
क्रेडाई नागपूर मेट्राेचे पदाधिकारी म्हणाले, गेल्यावर्षी बांधकामाला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने बांधकामाचा खर्च वाढला होता. पण आता दर कमी झाल्याने अनेक किमतीत बदल झाले आहेत. सध्या सिमेंट, स्टील आणि विटांचे भाव कमी आहेत. त्यामुळे बिल्डरांची गुंतवणूक काही प्रमाणात कमी झाली. अशा स्थितीत ग्राहकांना आवडत्या घराच्या खरेदीची उत्तम संधी आहे. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बिल्डरांनी किमती स्थिर ठेवल्याचा फायदा ग्राहकांना होत आहे.

राज्य सरकारच्या धोरणाने रेतीची दरवाढ
बांधकाम व्यावसायिक म्हणाले, जानेवारी ते जून हा बांधकामाचा हंगाम असतो. या दिवसात बांधकामाचा वेग वाढतो. सोबतच कच्च्या मालाच्या किमतीही वाढतात. पण यंदा दरवाढ झाली नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे. मात्र, राज्य सरकारच्या धोरणाने रेतीचे भाव वाढले आहेत. रेती घाट वैधपणे सुरू केल्यास दर कमी होतील. त्या तुलनेत विटा, सिमेंट आणि स्टीलचे भाव कमी झाले आहेत.

निवडणुकीपर्यंत भाववाढीची शक्यता कमीच
स्टीलची किंमत हंगामात कमी होणे, ही आश्चर्यकारक बाब आहे. ८ एमएम सळाख ४७.५० रुपये किलो आणि १२ ते २५ एमएचे भाव ४६ रुपये किलो आहेत. त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. हे भाव दोन वर्षांच्या तुलनेत फारच कमी आहेत. बाजारात डिमांड कमी वा उत्पादन वाढल्याने भाव उतरले असावेत, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत भाव वाढण्याची शक्यता नाहीच. नागपुरात स्टील देशाच्या सर्वच भागातून येते. शिवाय नागपुरातही स्टीलचे उत्पादन होते. भाव आणखी कमी झाल्यास ग्राहकांचा फायदा होईल.-राजेश सारडा, अध्यक्ष, स्टील अ‍ॅण्ड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भ.

Web Title: speed of construction; Even after that, cement and steel prices remained stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर