नागपूर-मुंबई दरम्यान रविवारी स्पेशल ट्रेन ! गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय
By नरेश डोंगरे | Updated: January 22, 2026 20:27 IST2026-01-22T20:26:44+5:302026-01-22T20:27:39+5:30
Nagpur : शनिवारी, रविवारी मुंबई नागपूर मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याचे ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने एक विशेष निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्री मुंबईहून नागपूरसाठी तर रविवारी रात्री नागपूरहून मुंबईसाठी स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहे.

Special train between Nagpur-Mumbai on Sunday! Central Railway's decision to control crowd
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी, रविवारी मुंबईनागपूर मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याचे ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने एक विशेष निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्री मुंबईहून नागपूरसाठी तर रविवारी रात्री नागपूरहून मुंबईसाठी स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहे.
नागपूर मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर वर्षभर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यात मुंबईला नोकरी करणारी तसेच विविध कामाच्या निमित्ताने जाणारी मंडळी शनिवारी नागपूर-विदर्भाकडे परत येतात. ही मंडळी पुन्हा रविवारी रात्री मुंबईकडे निघतात. त्यामुळे शनिवारी रात्री दोन दिवस नागपूर-मुंबई मार्गावर प्रवाशांची जास्तच गर्दी असते. गर्दी वाढल्याने रेल्वे गाड्यात पाय ठेवायला जागा नसते. अनेकजण पर्याय नसल्याने खासगी वाहने, खासगी बसचा पर्याय निवडतात. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता एक नवीन निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गाडी क्रमांक ०२१३९ ही स्पेशल ट्रेन शनिवारी २४ जानेवारीला मध्यरात्री ००.२० वाजता मुंबईहून सुटेल आणि रविवारी दुपारी ३.३० वाजता नागपुरात पोहोचेल.
त्याच प्रमाणे गाडी क्रमांक ०२१४० ही स्पेशल ट्रेन रविवारी २५ जानेवारीला रात्री ८ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
येथे थांबणार गाड्या
या दोन्ही गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबतील. त्यामुळे या ठिकाणावरूनही प्रवाशांना गाडीत पुढच्या प्रवासाला बसता येणार आहे.
२२ एलएचबी कोचेस
या दोन्ही विशेष गाड्यांना एकूण २२ एलएचबी कोचेस राहणार आहेत. ज्यात १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.