लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
By नरेश डोंगरे | Updated: October 4, 2025 00:30 IST2025-10-04T00:26:19+5:302025-10-04T00:30:17+5:30
'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम'चा झाला फायदा

लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: गुरुवारचा दिवस नागपूरच्या रेल्वे स्थानकासाठी विविध दृष्टीकोनातून ऐतिहासिक ठरला. अवघ्या २४ तासांत या रेल्वे स्थानकावर तब्बल अडीच ते पावणेतीन लाख प्रवासी आले. नजर जाईल तिकडे माणसंच माणसं. गर्दीत चोर-भामटे सक्रिय होतात अन् नंतर माणूसकी हरविते, असे म्हणतात. मात्र, गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत गर्दीचा महासागर उसळला असताना रेल्वे स्थानकावर माणूसकीचेही पदोपदी दर्शन झाले. खास करून वृद्ध, महिला आणि लहान मुलांना स्वयंस्फूर्त सेवेकऱ्यांनी खाण्या-पिण्याच्या पदार्थांसह उठण्या-बसण्यासाठी, जाण्यायेण्यासाठी केलेली मदत चिरंतर लक्षात राहिल, अशी होती.
हरवलेल्या व्यक्तींच्या, खास करून लहान मुलांच्या बाबतीतील सर्वच घटना संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स करणाऱ्या होत्या. यापैकी तेलंगणातील 'बिछडलेल्या बाप-लेकाची' एक घटना फारच हृदयस्पर्शी ठरली.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी पवित्र दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत भाविक येतात. गुरुवारीही अभूतपूर्व गर्दी होती. रेल्वे स्थानकाच्या सर्वच्या सर्व फलाटांवर, बाहेरच्या परिसरात आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये बाबांच्या अनुयायांची प्रचंड गर्दी होती. कोण, कोणत्या प्रांतातील, कोणत्या गावातील, ते माहिती नव्हतं. मात्र, प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीसाठी तत्पर दिसत होते. यातील अनेक वृद्ध दिवसभरात आपल्या नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तींपासून दुरावले. मात्र, माहिती मिळताच हरविलेल्या व्यक्तींना सेवाभावी व्यक्ती, रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी शोधून नातेवाईकांची भेट घालवून दिली. रात्री ९ च्या सुमारास मात्र एका ९ वर्षीय लहानग्याच्या हरविण्यामुळे त्याच्या कुटुंबियांसोबतच अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली होती.
हा मुन्ना तेलंगणातील रहिवासी होय. नातेवाईकांसोबत बुधवारी दीक्षाभूमीवर आला अन् गुरुवारी रात्री गावी परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहचला. गर्दीत त्याचा हात वडिलांच्या हातून सुटला अन् गहजब झाला. जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी मुन्ना मात्र दिसतच नव्हता. अर्धा-पाऊण तास शोधाशोध करूनही पत्ता लागला नाही. त्यामुळे रडवेल्या अवस्थेत वडिल अण्णा रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी माहिती देताच वरिष्ठ निरीक्षक गाैरव गावंडे यांनी लगेच शोधमोहिम सुरू केली.
'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम'चा फायदा
रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी यावर्षी गर्दीतील माणसं शोधण्यासाठी प्रथमच रेल्वे स्थानकावर 'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम' सुरू केली. त्यामुळे अडीच लाखांच्या गर्दीचा बंदोबस्त हाताळणारे १६५ पोलीस कर्मचारी प्रत्येक अधिकाऱ्याच्या मोबाईल अॅपवर दिसत होते. कोण कुठे आहे, तेथे नेमकी काय स्थिती आहे, ते कळत होते. या सिस्टममुळे एका क्षणातच हरविलेल्या मुन्नाचे वर्णन, फोटो गर्दीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या मोबाईलवर पोहचला अन् त्या आधारे अवघ्या १५ मिनिटात मुन्ना एका पोलिसाच्या नजरेस पडला.
भाषेची अडचण अन्...
या प्रकरणातील वैशिष्ट्य म्हणजे, मुन्नाला केवळ तेलगू भाषाच येत होती. दुसरी भाषा त्याला कळत नसल्याने त्याची मोठी अडचण झाली होती. दरम्यान, मुन्नाला रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बापाला मुलाने आणि मुलाला बापाने पाहिले अन् दोघेही एकमेकांना घट्ट बिलगले. ही गळाभेट आनंदाश्रूत चिंब झाली. नंतर भरल्या डोळ्यांनी पोलिसांचे आभार माणून मुन्ना आणि अण्णा आपल्या माणसांसोबत गावाकडे निघून गेले.