मान्सूनच्या संथ गतीने बॅकलॉग वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 00:18 IST2020-07-12T00:15:53+5:302020-07-12T00:18:32+5:30
काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनच्या संथ गतीने बॅकलॉग वाढण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. साधारणत: या काळात सरासरी २७२.६ मिमी पावसाची नोंद होत असते. यावरून स्पष्ट दिसते की आठवडाभर पाऊस थांबला असल्याने पावसाचा बॅकलॉग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात या मान्सूनमध्ये आतापर्यंत ३९८.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. १ जूनपासून ११ जुलैपर्यंत नागपुरात सरासरी ६ टक्के, अमरावतीत ५, चंद्रपूरमध्ये ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मात्र याउलट गडचिरोलीत २ टक्के, भंडारा २ टक्के आणि वर्ध्यात ३ टक्के पाऊस कमी झाला. गोंदिया जिल्ह्यात सामान्यपेक्षा २८, अकोल्यामध्ये २१ टक्के आणि यवतमाळमध्ये २० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे कमी पावसामुळे हे तिन्ही जिल्हे रेड झोनमध्ये आले आहेत. वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांची स्थिती समाधानकारक आहे. या दोन्ही जिल्ह्यात सामान्यपेक्षा अनुक्रमे ३६ आणि २१ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.
उमसने वाढविला मनस्ताप
शहरात शनिवारी सकाळपासून ढग दाटले होते. दुपारपर्यंत राहून राहून ढगांमधून ऊन तापत होते. हवेचा वेग कमी असल्याने आणि वातावरणात आर्द्रता असल्याने उमस वाढायला लागली आहे. कमाल तापमान सामान्यपेक्षा एक अंश अधिक म्हणजे ३३.२ अंश आणि रात्रीचे तापमान २४.३ अंशावर कायम होते.
विदर्भाच्या काही जिल्ह्यात पाऊस
विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३०.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय अकोलामध्ये २७.४ मिमी, गोंदियात १४.२ मिमी, वर्ध्यात १६ मिमी, अमरावतीत ४ मिमी, ब्रह्मपुरीत ३.२ मिमी आणि बुलडाण्यात २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.