चौथीत फी न भरल्याने सहावीच्या विद्यार्थ्याला शाळेकडून मानसिक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:54 IST2025-06-06T19:53:20+5:302025-06-06T19:54:04+5:30
प्राचार्यासह दोन शिक्षकांवर गुन्हे दाखल : वडिलांना व्हॉट्सॲपवर पाठविली टीसी

Sixth grade student faces mental harassment from school for not paying fees in fourth grade
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या इयत्ता चौथीची फी भरली नाही, असा ठपका ठेवत शिक्षकांनी विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिला. एवढेच नव्हे तर शाळेत त्याच्या वडिलांच्या व्हाट्स अॅपवर त्याची टीसीदेखील पाठविली. हा प्रकार कोंढाळी येथे घडला असून, पोलिसांनी प्राचार्य, उपप्राचार्य व वर्गशिक्षक या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल खालिक शेख (रा. कोंढाळी, ता. काटोल) यांचा मुलगा कोंढाळी येथील लाखोटिया भुतडा सीबीएसई स्कूलमध्ये शिक्षण घेतो. सध्या तो इयत्ता सहावीचा विद्यार्थी आहे. अब्दुल खालिक शेख यांनी त्यांच्या मुलाची इयत्ता चौथीची फी भरली नाही म्हणून शिक्षकांनी त्याला मानसिक त्रास दिला. एवढेच नव्हे तर लेखी अथवा तोंडी मागणी न करता शाळेत अब्दुल खालिक शेख यांना त्यांच्या मुलाची टीसीदेखील व्हॉट्सअॅपवर पाठविली.
परिणामी, त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी शिक्षणाचा हक्क कायदा २०१५, कलम ७५ अन्वये शाळेचे प्राचार्य आशुतोष केदार पवार, उपप्राचार्य योगेश चौधरी व वर्गशिक्षक अमोल वडाळकर या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वृत्त लिहिस्तो पोलिसांनी तिघांपैकी कुणालाही चौकशीसाठी बोलावले नव्हते. या घटनेचा तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत.