उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:39 AM2022-11-15T11:39:02+5:302022-11-15T11:45:03+5:30

नुवाल, शॉ, अग्रवाल यांचा समावेश

Six industrialists of Nagpur added in the list of richest people in the country | उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती

उपराजधानीची मान उंचावली! देशातील श्रीमंतांच्या यादीत सहा नागपूरकर उद्योगपती

Next

नागपूर : देशपातळीवरील एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत नागपूर हे कार्यक्षेत्र असलेल्या सहा उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत श्रीमंतांच्या यादीत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद या शहरांचे प्राबल्य दिसून येत होते. मात्र, या यादीत नागपूरच्या उद्योगपतींचा समावेश झाल्याने शहराची मान उंचावली आहे.

या अहवालात देशातील १,०३६ सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी, दुसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी, तिसऱ्या क्रमांकावर सायरस पुनावाला, चौथ्या क्रमांकावर शिव नाडर, पाचव्या क्रमांकावर राधाकिशन दमानी, सहाव्या क्रमांकावर विनोद शांतीलाल अदानी, सातव्या क्रमांकावर एसपी हिंदुजा, आठव्या क्रमांकावर एलएन मित्तल, नवव्या क्रमांकावर दिलीप संघवी आणि दहाव्या क्रमांकावर उदय कोटक यांचा समावेश आहे.

नागपुरातील ज्या सहा उद्योजकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यात सोलर इंडस्ट्रीज इंडिया केमिकल्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्सचे संचालक सत्यनारायण नुवाल (१२० क्रमांक), हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल फूड ॲण्ड बेव्हरेजेसचे राजेंद्रकुमार शिवकिशन अग्रवाल (३२७ क्रमांक), कमलकुमार शिवकिशन अग्रवाल (४११ क्रमांक), शिवकिशन मूलचंद अग्रवाल (४५९ क्रमांक) व सुशीलकुमार शिवकिशन अग्रवाल (५९८ क्रमांक) आणि जयस्वाल नेको इंडस्ट्रीजचे संचालक बसंत लाल शॉ (९८७ क्रमांक) यांचा समावेश आहे.

हे सर्वेक्षण संबंधित उद्योगपतींनी त्यांच्या उद्योग व्यवसायात केलेली गुंतवणूक, उत्पादन, त्यातून झालेला नफा आणि त्यांच्या एकूण संपत्तीच्या वर्तमान मूल्याच्या आधारावर करण्यात आले आहे.

लहान शहरांमधून ‘सरप्राइज’

साधारणतः मोठ्या शहरांमध्येच श्रीमंतांचा भरणा असतो, असा समज आहे. मात्र, या अहवालातून लहान शहरांतूनदेखील १७८ श्रीमंतांची नावे समोर आली. थ्रिसूर, सूरज, कोईम्बतूरनंतर या यादीत नागपूर व औरंगाबादचा क्रमांक आहे हे विशेष. नागपुरातील सहा उद्योगपतींकडे ३० हजार ६०० कोटींची संपत्ती असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Six industrialists of Nagpur added in the list of richest people in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.