वाठोड्यात बहिण भावाला टिप्परने चिरडले; संतप्त जमावाने टिप्पर पेटविले
By दयानंद पाईकराव | Updated: December 29, 2023 13:09 IST2023-12-29T13:09:12+5:302023-12-29T13:09:48+5:30
संतप्त जमावाने टिप्पर पेटविले : अग्नीशमन दलाच्या गाडीवरही दगडफेक

वाठोड्यात बहिण भावाला टिप्परने चिरडले; संतप्त जमावाने टिप्पर पेटविले
नागपूर : कचरा उचलणाऱ्या टिप्परने बहिण-भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येऊन राज्य राखीव दलाच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविले आहेत.
अंजली ननेलाल सैनी (वय २०) आणि सुमित ननेलाल सैनी (वय १५) दोघे. रा. अंबेनगर बिडगाव अशी मृतकांची नावे आहेत. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पींग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परची सतत ये-जा सुरु असते. दरम्यान बिडगाव चौकात दुचाकीवरून जात असलेल्या अंजली आणि सुमित यांना कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले. यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. टिप्परला लागलेली आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्नीशमन दलाच्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सदर्शन, झोन चारचे उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले.