नवीन वर्षात चांदी ५६,३०० तर सोने ९,६०० ने महाग ; यंदा भाव कितीवर जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:53 IST2026-01-19T14:50:23+5:302026-01-19T14:53:06+5:30
Nagpur : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपुरातील सराफा बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईच्या मागणीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

Silver to cost Rs 56,300 and gold to cost Rs 9,600 in the new year; How high will the price go this year?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपुरातील सराफा बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईच्या मागणीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. दरवाढीमुळे प्रत्येक शहरात सोने (कॅरेट) आणि चांदीचे खरेदी-विक्रीचे दर बदलले आहेत.
सोने १.४७ लाख, तर चांदीचे दर २.९२ लाखांवर
नवीन वर्षात ३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचे दर १.४७ लाख आणि चांदीचे दर २.९२ लाखांवर गेले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी या मौल्यवान धातूंच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे.
नवीन वर्षात सोने ९,६०० हजारांनी वाढले
नवीन वर्षात २४ कॅरेट सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह ९,६०० रुपयांनी वाढले. सोन्याच्या भावात दरदिवशी होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेचा बाब ठरली आहे. ग्राहक आता १४ कॅरेट दागिन्यांची मागणी करीत आहेत.
चांदीतही ५६,३०० हजारांची झळाळी
सोन्याप्रमाणे चांदीलाही झळाळी आली असून केवळ १८ दिवसांत दर ५६,३०० रुपयांनी वाढले. औद्योगिक क्षेत्रात चांदीला मागणी वाढल्यामुळे बाजारपेठेत उपलब्धता कमी आहे. पुढेही दरवाढीची शक्यता आहे.
यंदा भाव कितीवर जाणार?
सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली वाढ ही कृत्रिम असून पुढे किमती उतरतील, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. परंतु, सध्या वाढणाऱ्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लग्नसराईत खरेदी कमी झाली आहे. यंदा भाव कितीवर जाणार, हे जागतिक स्तरावर दरदिवशी होणाऱ्या घडामोडींवर अवलंबून राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सोने-चांदीत दरवाढीची कारणे काय ?
सोने व चांदीच्या दरवाढीची अनेक कारणे आहेत. जागतिक भू-राजकीय तणाव, भारत आणि चीनच्या मध्यवर्ती बँकांची सोने खरेदी, अमेरिकन डॉलरची घसरण आणि व्याजदर, जागतिक स्तरावर चांदीची औद्योगिक क्षेत्रात वाढलेली मागणी आणि कमी उपलब्धता, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात होणारे सोने महाग पडत आहे.
गेल्या सहा महिन्यांतील दरवाढ (३ टक्के जीएसटीसह)
महिना सोने (वाढ) चांदी (वाढ)
३१ जुलै १,०१,७६० (१,०३०) १,१५,४६० (५,०००)
३१ ऑगस्ट १,०७,०० (४,५००) १,२५,१५० (१०,५११)
३० सप्टें. १,२०,१०० (१२,१५०) १,४७,८०५ (२०,१००)
३१ ऑक्टो. १,२३,१०० (१,८६०) १,५२,५५० (१,६५०)
३० नोव्हें. १,३१,७५० (७,०००) १,७८,१०० (२३,६००)
३१ डिसें. १,३७,७०० (४,५३०) २,३९,३७२ (५८,३००)
दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीकडे कल वाढला
आता लोक सोन्याकडे केवळ 'अलंकार' म्हणून नाही, तर एक 'भक्कम गुंतवणूक' म्हणून पाहत आहेत. २०२६ च्या सुरुवातीलाच हा कल अधिक गडद झाला आहे. ग्राहक दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. आताचा ग्राहक केवळ सण किंवा लग्नासाठी दागिने खरेदी करत नाही, तर भविष्यातील सुरक्षिततेसाठी सोन्याच्या नाण्यांना अधिक पसंती देत आहे. 'मेकिंग चार्जेस' टाळण्यासाठी डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढली आहे.
गतवर्षी सोन्यात ५७,९०० रुपयांची, तर चांदीत १,५५, ८५०ची वाढ
वर्ष-२०२५ मधील मौल्यवान धातूंच्या किमतीची आकडेवारी पाहिल्यास १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३ टक्के जीएसटीसह विक्रमी ५७,९०० रुपये आणि चांदीच्या दरात १,५५, ८५० रुपयांची वाढ झाली गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे.