सिकलसेल निर्मुलनासाठी प्रत्येक गर्भवतीची सिकलसेल तपासणी आवश्यक
By सुमेध वाघमार | Updated: February 9, 2026 17:31 IST2026-02-09T17:30:37+5:302026-02-09T17:31:44+5:30
Nagpur : सिकलसेल मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेची सिकलसेल तपासणी होणे अनिवार्य आहे.

Sickle cell screening is essential for every pregnant woman to eradicate sickle cell.
नागपूर: सिकलसेल मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेची सिकलसेल तपासणी होणे अनिवार्य आहे. जर माता बाधित असेल, तर पित्याची तपासणी आणि त्यानंतर गर्भाची वैद्यकीय चाचणी करून वेळीच निर्णय घेणे हाच या आजाराला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालरोग व सिकलसेल तज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर येथे राज्यातील पहिल्या ‘सिकलसेल वेलनेस हब’चे उद्घाटन सोमवारी पार पडले. याप्रसंगी आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, ‘एनएनइएफ’चे मॅनेजिंग ट्रस्टी विक्रांत श्रोत्रीय आणि ‘नॅस्को’चे सचिव गौतम डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मेडिकलचे उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार, डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी व स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुश्री वाईकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुलांच्या 'हायड्रॉक्सीयुरिया' गोळ्यांची गरज
डॉ. जैन यांनी प्रशासनाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले. सध्या सरकारी रुग्णालयांत 'हायड्रॉक्सीयुरिया' हे औषध कॅप्सूल स्वरूपात आहे, जे लहान मुलांना गिळण्यास त्रास होतो. त्याऐवजी पाण्यात विरघळणाºया गोळ्या सर्व शासकीय रुग्णालयांत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
वयाच्या पाच वर्षांनंतर डोळे, किडनीची तपासणी
सिकलसेलबाधित मुलांच्या अवयवांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी वयाच्या पाच वर्षांनंतर त्यांची नियमित किडनी, यकृत, डोळे आणि हृदयाची तपासणी होणे गरजेचे आहे. यामुळे आजाराचे निदान पहिल्या टप्प्यात होऊन उपचार सोपे होतील, असा सल्लाही डॉ. जैन यांनी दिला.
मेडिकलमध्ये बोनमॅरो ट्रान्सप्लांट
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सिकलसेल रुग्णांसाठी मोठी घोषणा केली. पुढील सहा महिन्यांत मेडिकलमध्ये 'बोनमॅरो ट्रान्सप्लांट' केंद्र कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना अत्यंत हा महागडा उपचार माफक दरात उपलब्ध होतील. सकलसेल निर्मूलनासाठी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन जनजागृतीचे केंद्र बनणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.