धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 00:09 IST2025-07-17T00:08:48+5:302025-07-17T00:09:37+5:30
तुरुंग प्रशासनात खळबळ, पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय उपचारासाठी पाठवला

धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तुळशीराम लाकडू शेंडे (५४, मोरगाव अजुर्नी, गोंदिया) असे मृत कैद्याचे नाव आहे. शेंडेने २०१२ मध्ये साकोली येथे हत्या केली होती. त्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो छोटी गोलच्या बॅरेक क्रमांक ४ मध्ये होता. बॅरेकजवळ शौचालय आणि रंगकाम विभागाचे गोदाम आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता शेंडेने त्याच्या अंतर्वस्त्राच्या इलॅस्टिकचा वापर करत गोदामाच्या खिडकीच्या पट्टीला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोदाम मागील भागात असल्याने इतरांचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. काही वेळाने शेंडेने आत्महत्या केल्याचे कळताच तुरुंगात गोंधळ उडाला. धंतोली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय उपचारासाठी पाठवला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडे काही काळापूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. निर्धारित वेळ घालवल्यानंतर तो तुरुंगात परतला. शेंडेच्या आत्महत्येबाबत तुरुंगात विविध चर्चांना उधाण आले आहे. इतक्या कैदी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये शेंडेने आत्महत्या कशी केली व कुणालाही तो तसे करताना दिसला कसा नाही असा सवाल करण्यात येत आहे. धंतोली पोलिसांकडून तपास सुरू आहे.