Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू

By जितेंद्र ढवळे | Updated: May 12, 2025 22:39 IST2025-05-12T22:36:16+5:302025-05-12T22:39:18+5:30

Nagpur News: नागपुरातील उमरेड तालुक्यात जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला.

Shocking! Five people die after drowning in a water-filled pit in Nagpur | Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू

Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू

जितेंद्र ढवळे, नागपूर: जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात धक्कादायक घटना घडली. जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला.  मृतकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. ज्यात दोन महिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रज्जु ऊर्फ रंजना सूर्यकांत राऊत (वय, २२), रोशनी चंद्रकांत चौधरी (वय, ३२), मोहित चंद्रकांत चौधरी (वय, १०), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (वय, ८), तिघेही धुळ्यातील लक्ष्मीनगर येथील निवासी आहेत. अन्य एक मृत तरुणाचे नाव एहतेशाम मुक्तार अन्सारी (वय २०) आहे.

नागपूर गुजरवाडी येथील निवासी सूर्यकांत जीवन राऊत हे एका चहाच्या टपरीवर काम करतात. त्यांच्याकडे गृहप्रवेश कार्यक्रम होता. याअनुषंगाने त्यांची मुलगी धुळे येथील निवासी रोशनी चौधरी आपल्या कुटुंबीयांसह ४ मे रोजी माहेरी आली. रविवारी (११ मे) दुपारी २ वाजता रोशनी चौधरी, मुलगा मोहित, मुलगी लक्ष्मी आणि लहान बहीण रज्जू ऊर्फ रंजना राऊत हिच्यासह घरातून बाहेर पडले.

रविवारी रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने वडील सूर्यकांत राऊत यांनी नागपूर गणेशपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविली. दुसरीकडे या कुटुंबीयांसमवेत एहतेशाम मुक्तार अन्सारी हा सुद्धा गेला होता. तो सुद्धा रात्री परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले होते. राऊत आणि अन्सारी दोन्ही कुटुंबांनी रात्री उशिरापर्यंत आप्तस्वकीय, मित्रपरिवाराकडे शोध घेतला. कुणाचाही शोध लागला नाही. अखेरीस पाचही जणांचे मृतदेह सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आले.

पाच जण हरवल्याची तक्रार पोलिसांना मिळताच पोलिस ॲक्शन मोडवर आले. पोलिसांनी तातडीने सायबर विभागाकडे याबाबत सूचना दिल्या. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कुही फाट्यालगत असलेल्या गिट्टी खदान परिसर ट्रेस झाला. कुटुंबीय आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. रोशनी चौधरी हिचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. गिट्टी खदानच्या कडेला एक दुचाकी, चपलाचे जोड आणि कपडे पडून होते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असताना अन्य चार जणांचे प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले.

पाचही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले आहेत. मुलगा आणि मुलीचे कपडे गिट्टी खदानीच्या काठावर होते. एकमेकांना वाचविण्यात अन्य लोकांचा जीव गेला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. चौकशीअंती घटनेचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती कुही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिटूरकर यांनी दिली.

Web Title: Shocking! Five people die after drowning in a water-filled pit in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.