"छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही"; सुहास कांदेंनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:51 IST2024-12-18T12:36:16+5:302024-12-18T12:51:47+5:30

छगन भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा असं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलं

Shiv Sena Shinde faction MLA Suhas Kande challenged Chhagan Bhujbal to resign | "छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही"; सुहास कांदेंनी साधला निशाणा

"छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही"; सुहास कांदेंनी साधला निशाणा

Suhas Kande on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने प्रचंड नाराज आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून छगन  भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. मंगळवारी छगन भुजबळ यांनी पक्षातील सहकाऱ्यांवरही निशाणा साधला होता. त्यानंतर समता परिषदेच्या बैठकीनंतर आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मात्र आता भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. लोकसभेत काम न केल्यामुळे छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे सुहास कांदे यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळ नाराज होऊन मतदारसंघात परतले होते. त्यानंतर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा जाहीर निषेध नोंदवला. यावरुनच आता सुहास कांदे यांनी भुजबळांना आव्हान दिले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुहास कांदे यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा असं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिलं आहे. छगन भुजबळांकडे पाहून मला आता कीव येते असंही सुहास कांदेंनी म्हटलं.  तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार भुजबळांना फोन देखील करणार नाहीत असंही कांदे म्हणाले.

"छगन भुजबळांची मला कीव येते. मी त्यांना बोललो होतो तुम्ही सुंदर असता तर चांगले अभिनेते झाला असतात. ते दुर्दैवाने दिसायला चांगले नाहीत म्हणून अभिनेते झाले नाहीत. छगन भुजबळ म्हणजेच ओबीसी समाज आहे का? भुजबळांच्या विरोधात तक्रार करणारा सुहास कांदे आहे. त्यांनी दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात काम केले नाही याचे पुरावे आम्ही दिले आहेत. त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालेले नाही," असं सुहास कांदे म्हणाले. 

"छगन भुजबळांनी कितीही आगपाखड करावी तरी ते राजीनामा देणार नाहीत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत. खरंच ते भुजबळ असतील तर त्यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा द्यावा," असं आव्हान सुहास कांदे यांनी दिलं.

"छगन भुजबळांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात विशिष्ट जातीचे लोक दिसतील. एकाच समाजाचे लोक त्यांना पाठिंबा देतात आणि डोक्यावर उचलतात. पण त्यांनी महायुतीबरोबर जी गद्दारी केली आहे त्याचे हे फळ आहे. ते अजित पवारांच्या विरोधात नाही नाही ते बोलले आहेत. अजित पवार त्यांना फोनही करणार नाहीत. ते खरंच भुजबळ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्यात राजीनामा देण्याची हिंमत नाही," असंही सुहास कांदे म्हणाले.
 

Web Title: Shiv Sena Shinde faction MLA Suhas Kande challenged Chhagan Bhujbal to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.