'ती' कामाला गेली... पण परत का आली नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:42 IST2026-03-09T12:41:08+5:302026-03-09T12:42:11+5:30
Nagpur : महिला दिनानिमित्त जगभर महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाचा गौरव होत असताना, त्यांची सुरक्षा आणि सबलीकरणाच्या चर्चा रंगत असतानाच नागपुरात मृत्यूशी झुंज देत असलेल्या आम्रपाली कालसर्पे (३६) व रोशनी सूर्यकांत उमाठे (३२) दोन महिलांनी अखेर प्राण सोडले.

'She' went to work... but why didn't she come back?
राजेश शेगोकार
नागपूर : महिला दिनानिमित्त जगभर महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाचा गौरव होत असताना, त्यांची सुरक्षा आणि सबलीकरणाच्या चर्चा रंगत असतानाच नागपुरात मृत्यूशी झुंज देत असलेल्या आम्रपाली कालसर्पे (३६) व रोशनी सूर्यकांत उमाठे (३२) दोन महिलांनी अखेर प्राण सोडले. या दोघी कोण, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. कारण, त्या प्रख्यात, प्रसिद्ध अशा काही श्रेणीत नव्हत्या. पण, या आणखी दोन मृत्यूंनी संवदेनशील समाजमन अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या दोघी नागपूरपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या एक्सप्लोसिव्ह कंपनीत १ मार्चच्या सकाळी झालेल्या स्फोटातील जखमी होत्या. आता या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २२वर पोहोचली आहे. यात तब्बल १९ महिला आहेत. हा आकडा केवळ आकडा नाही; तो २२ उद्ध्वस्त संसारांचा आणि आईच्या मायेपासून कायमचे वंचित झालेल्या लेकरांचा न बोलता येणारा आक्रोश आहे.
एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कंपनीत १ मार्चच्या सकाळी भीषण स्फोट झाला. त्यावेळी युनिटमध्ये ३६ कामगार काम करत होते, त्यापैकी ३० महिला होत्या. संसाराचा गाडा ओढण्यासाठी या महिला रोज जीव मुठीत घेऊन स्फोटकांच्या कारखान्यात कामाला जात होत्या. अनेक महिला चाळिशीच्या आतल्या. घरात शेती नाही, स्थिर उत्पन्न नाही, म्हणून मजुरीसाठी धोक्याशी रोज सामना करणे, हा त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. या कामगारांपैकी बहुतेक ठेकेदारीवर काम करणारे होते. त्यांच्या नावांची व्यवस्थित कामगार नोंदही नाही. आजूबाजूच्या खेड्यांतून त्या पहाटेच्या अंधारात कंपनीकडे निघत. नरखेड परिसरातील अनेक महिलांसाठी हा प्रवास अधिकच कठीण. सकाळची सहाची शिफ्ट पकडायची असेल तर रात्री दोन वाजता उठून घरकाम आटोपायचे, स्वयंपाक करून डबा घ्यायचा आणि पहाटे चार वाजता कंपनीची गाडी पकडायची.
तास - दीड तासाचा प्रवास, जंगलातून जाणारा खडतर रस्ता आणि वेळेवर न पोहोचल्यास मजुरीत कपात. नाइलाजाने हा सगळा प्रवास त्या करत राहिल्या. या कंपनीत खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटकं तयार होतात. पण, या महिलांसाठी सुरक्षिततेची व्यवस्था कितपत होती? प्रशिक्षण, सुरक्षासाधने, नियमांची काटेकोर अंमलबजावणी या प्रश्नांची उत्तरे आजही धुसर आहेत. त्यामुळे अशा प्रकारे धोका पत्करून काम करणाऱ्या कामगार महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?
स्फोटानंतर सरकार हादरले, चौकशी सुरू झाली, गुन्हे दाखल झाले. पण, इतकी हलगर्जीपणा आधी का होता? स्फोटक उद्योगांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) वर आहे. औद्योगिक सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ (DISH) ही यंत्रणा कार्यरत आहे. या दोन्ही महत्त्वाच्या कार्यालयांचे मुख्यालय नागपुरातच असताना हे पांढरे हत्ती नेमके काय करतात?
अलीकडच्या काळात नागपूर हे स्फोटक उद्योगांचे मोठे केंद्र झाले आहे. मात्र, दुर्दैवाने नागपूर जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात सहा स्फोट होऊन ४४ जणांनी प्राण गमावले. म्हणजेच नियम, यंत्रणा आणि कागदोपत्री व्यवस्था असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावी आहे, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतो. मजुरीसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या महिला केवळ कामगार नाहीत. त्या एखाद्या घराचा कणा होत्या, कोणाच्या संसाराची उभी भिंत होत्या, तर कोणाच्या लेकरासाठी सगळी दुनिया होत्या. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे केवळ एका अपघाताकडे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाकडे दुर्लक्ष करणे होय.