ती काका म्हणायची, त्याने बलात्कार केला, न्यायालयाने सुनावला २० वर्षाचा कारावास

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 30, 2023 18:12 IST2023-10-30T18:11:33+5:302023-10-30T18:12:13+5:30

सक्करदरामधील घटना : आरोपी चंदननगर येथील रहिवासी

She used to call him uncle, he raped, the court sentenced him to 20 years imprisonment | ती काका म्हणायची, त्याने बलात्कार केला, न्यायालयाने सुनावला २० वर्षाचा कारावास

ती काका म्हणायची, त्याने बलात्कार केला, न्यायालयाने सुनावला २० वर्षाचा कारावास

नागपूर : ती त्याला विश्वासाने काका म्हणत होती. परंतु, त्याने याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या नराधम आरोपीला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एच. सी. शेंडे यांनी हा निर्णय दिला.

नरेश देवराव गणवीर (५३), असे आरोपीचे नाव असून तो चंदननगर येथील रहिवासी आहे. त्याला घरात बळजबरीने प्रवेश करण्यासाठी सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तर, धमकी देण्याच्या गुन्ह्याकरिता दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. पीडित मुलगी घटनेच्या वेळी १४ वर्षे वयाची होती. ती सक्करदरा पोलिसांच्या क्षेत्रात राहत होती. आरोपीचे तिच्या घरी जाणे-येणे होते.

१४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान, आरोपीने तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच, हे कुकृत्य लपवून ठेवण्यासाठी तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी काही दिवस गप्प राहिली. परंतु, २० मार्च २०२२ रोजी तिने आत्याला आपबिती सांगितली. त्यामुळे आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक माधुरी वाघाडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.

Web Title: She used to call him uncle, he raped, the court sentenced him to 20 years imprisonment