ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 00:00 IST2025-08-09T23:57:59+5:302025-08-10T00:00:14+5:30
स्थळ आहे रेल्वे स्थानक आणि वेळ आहे साधारणत: ९.३० ते १० च्या दरम्यानची. मोजक्या मान्यवरांना सोबतीला घेऊन नागपूरहून पुण्याकडे निघाणारी 'ती' म्हणजे, नवीन अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस होय.

ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
नागपूर : भव्य सभामंडप तयार झाला आहे. हार, तोरणं, पताका आणि फुलांनी परिसर सजविण्यात आला आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी यजमनांची तयारी सुरू आहे. अशात तीसुद्धा रात्रीच्या अंधारात लाजत मुरडत आली आहे. मुहूर्ताची घटिका पुढ्यात असून, तिची 'बिदाई' करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पोहचणार आहेत.
स्थळ आहे रेल्वे स्थानक आणि वेळ आहे साधारणत: ९.३० ते १० च्या दरम्यानची. मोजक्या मान्यवरांना सोबतीला घेऊन नागपूरहून पुण्याकडे निघाणारी 'ती' म्हणजे, नवीन अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस होय. रविवारी सकाळी तिची पहिल्यांदाच मोजक्या मात्र विविध क्षेत्रातील मान्यवरांशी गाठ पडणार आहे.
कर्तव्यपूर्तीसाठी ती शुक्रवारी रात्रीच मुंबईहून नागपुरात पोहचली आहे. रेल्वे यार्डात तिला सजविले जात आहे. रविवारी भल्या सकाळी ती फलाट क्रमांक ८ वर येऊन उभी राहणार आहे. तिला प्रवासाच्या शुभेच्छा देऊन मार्गस्थ करण्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
नागपूर स्थानकावर तिला भावी प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार, खासदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
स्थानक परिसरातील कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना नागपुरात दाखल झाले आहेत. विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल आज उशिरा रात्रीपर्यंत शुभारंभ सोहळ्याच्या तयारीत गुंतले होते.
जागोजागी रंगणार स्वागत सोहळे
अजनी नागपूर वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन मार्गे पुण्याला पोहचणार आहे. त्यासाठी नमूद प्रत्येक ठिकाणी तिच्या स्वागताची तयारी करण्यात आल्याची माहिती आहे.
अशी आहे तिची रचना
लक्झरी आणि सेमी हायस्पीड अशी ही गाडी प्रारंभी ८ कोच घेऊनच धावणार आहे. ज्यात १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (ईसी) आणि ७ चेअर कार (सीसी) यांचा समावेश आहे. ईसी कोचमध्ये ५२ प्रवासी, ५ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ७८ प्रवासी आणि लोको पायलटच्या कोचला जोडलेल्या २ सीसी कोचमध्ये प्रत्येकी ४४ अशा प्रकारे या गाडीत एकूण ५३० प्रवासी बसू शकतात.