घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत ! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची महसूलमंत्र्यांनी केली घोषणा
By योगेश पांडे | Updated: September 25, 2025 17:54 IST2025-09-25T17:50:17+5:302025-09-25T17:54:34+5:30
Nagpur : शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येईल व यासंदर्भातील नुकसान अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Separate assistance to those whose houses have collapsed and farmers whose lands have been eroded! Revenue Minister announces urgent assistance to flood victims
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुर व अतिवृष्टीमुळे झालेली आपत्ती फार मोठी आहे. झालेल्या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरणे याला आमचे सर्वात अगोदर प्राधान्य राहणार आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येईल व यासंदर्भातील नुकसान अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे उभा ठाकलेला संकटाचा डोंगर ओलांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे. कालपर्यंत १७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल. शेतकऱ्यांना तातडीची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून वाटप सुरू झाले आहे.
अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि व्यावसायिकही मदतीसाठी पुढे येत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर किंवा अमरावतीमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. त्याचे पंचनामे आम्ही करणार आहोत. शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठविला जाईल. केंद्र सरकारकडूनही मदत मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. उध्दव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार केला जाईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
अकोला येथील मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे जर ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर हा मोठा गुन्हा आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना महसूल विभागात वाव दिला जाणार नाही. मंडळ अधिकाऱ्याच्या वर्तनाबाबत विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून, शेतकऱ्यांचे नुकसान हेकेखोरपणामुळे झाले असल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.