शालार्थ आयडी घोटाळा, ६३२ शिक्षकांवर ठपका; प्रशासकीय चौकशीचा अहवाल शासनाला सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:33 IST2026-01-03T14:33:30+5:302026-01-03T14:33:51+5:30
शालार्थ आयडी प्रकरणात राज्य सरकारने ७ ऑगस्ट रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली. या समितीचे चौकशी अधिकारी म्हणून महेश पालकर यांना नियुक्त केले होते.

शालार्थ आयडी घोटाळा, ६३२ शिक्षकांवर ठपका; प्रशासकीय चौकशीचा अहवाल शासनाला सादर
नागपूर : नागपूर विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा अंतिम प्रशासकीय चौकशी अहवाल ३१ डिसेंबर रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये ६३२ शिक्षक दोषी आढळले असल्याचे शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी करणारे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.
शालार्थ आयडी प्रकरणात राज्य सरकारने ७ ऑगस्ट रोजी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली. या समितीचे चौकशी अधिकारी म्हणून महेश पालकर यांना नियुक्त केले होते.
एकीकडे शासनाची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे नागपूर पोलिसांकडूनही या प्रकरणात चौकशीसाठी अधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरूच होते. या प्रकरणात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिकाऱ्यांसह संस्थाचालक
व लिपिक यांनाही अटक करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी या प्रकरणात अटक केलेले यवतमाळ जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर हे कारागृहातून बाहेर आले आहेत.
नागपूर पोलिसांकडूनही या प्रकरणात तपास सुरू असताना शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अंतिम अहवाल ३१ डिसेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यात ६३२ शिक्षक दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.