मोकाट कुत्रा भुंकल्याने घाबरला, सहाव्या माळ्यावरून पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:58 IST2025-07-08T17:57:25+5:302025-07-08T17:58:08+5:30
Nagpur : पावनगावच्या प्रभासुपीतील देव हाइट्समधील घटना

Scared by a stray dog barking, 12-year-old boy falls to death from sixth floor
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात मोकाट कुत्र्यांची समस्या वाढत चालली असून, आता तर अगदी रहिवासी इमारतींमध्येदेखील हे कुत्रे शिरायला लागले आहेत. एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मोकाट कुत्रा भुंकल्याने घाबरून वाचण्यासाठी धाव घेतलेल्या १२ वर्षीय मुलाचा सहाव्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला.
कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या पालकांवर मोठा आघात झाला असून, परिसरात या घटनेवरून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जयेश रवींद्र बोकडे (१२) हा पावनगाव येथील प्रभासुपीतील देव हाइट्स या इमारतीत राहत होता. ती इमारत १० मजल्यांची असून, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. रविवारी सुटी असल्यामुळे तो दुपारी मित्रांसोबत खेळायला गेला होता. खेळणे झाल्यानंतर तो पाचव्या माळ्यावरील घरी परत जात होता. त्यावेळी एक मोकाट कुत्रा अचानक त्याच्यावर भुंकू लागला व मागे लागला. त्यामुळे जयेश घाबरला व तो जिन्यात पळायला लागला. पाचव्या माळ्यावरून सहाव्या माळ्यावर जात असताना त्याचा वेग जास्त होता. तेथील खिडकीला स्लायडिंग डोअर लागले होते व ते अर्धे उघडे होते. धावताना त्या कॉमन खिडकीतून जयेश तोल जाऊन खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या सोसायटीतील लोकांनी घरच्यांना माहिती दिली. त्याला तातडीने पारडी येथील भवानी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेचे 'प्राणिमित्र' धोरण मात्र अनेकांचे जीव घेतेय!
नागपूर शहर सध्या मोकाट कुत्र्यांच्या ताब्यात गेलेय आणि महापालिका हात झटकून मोकळी बसली आहे. तब्बल लाखावर मोकाट कुत्रे रस्त्यांवर दहशत माजवत आहेत आणि प्रशासन डोळे झाकून नियम सांगत आहे. दररोज २० ते २५ नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचा बळी पडतात. ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रशासनाच्या झोपेचा जिवंत पुरावा आहे. कुत्र्यांच्या चाव्याने दरवर्षी हजारो लोक जखमी होत आहेत. हे आंधळ्या, बहिया यंत्रणेकडून मात्र दुर्लक्षित केले जात आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या दैनंदिन जीवनात भीतीचे सावट आहे. रात्रीचे अपघात, रस्त्यावर कुत्र्यांचे थवे, चिरडलेली सायकली आणि हेल्मेट घातलेल्या चालकांवर चाल करून जाणान्या कुत्र्यांच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. या सगळ्यावर उपायकाहीच नाही. नसबंदीशिवाय दुसरा पर्यायच नाही, असे म्हटले जाते, पण तो पर्यायही फक्त कागदावरच आहे. पशुप्रेमी संघटनांच्या आडून प्रशासन स्वतःची निष्क्रियता लपवतेय, नागरिकांचे रक्षण महापालिकेचे कर्तव्य आहे की नाही? महापालिकेच्या 'प्राणीमित्र धोरणामुळे रस्त्यावर जीव मरणाला लागले आहेत. शाळेत जाणारी मुले, रात्री कामावरून घरी परतणारे, सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार, असा नागपूरकरांचा प्रश्न आहे.
आनंदाचा काही क्षणांतच बेरंग
रविवारची सुटी असल्यामुळे अपार्टमेंटमधील मुले खाली खेळायला गेली होती. काही वेळ अगोदर मुलांनी छोटेखानी सैंडविच पार्टदिखील केली. मात्र, काही वेळातच आनंदाचा बेरंग झाला. परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत असून याअगोदरदेखील लहान मुलांच्या मागे कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या होत्या. मनपाकडून यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नव्हती.