'साहित्य संघाला राजकारणी, व्यापाऱ्यांपासून वाचवा'; वर्तमान कार्यकारिणीही कुचकामी असण्याचा आराेप
By निशांत वानखेडे | Updated: February 5, 2026 20:26 IST2026-02-05T20:25:35+5:302026-02-05T20:26:15+5:30
Nagpur : ज्या प्रमाणे क्रीडा संस्था या खेळाडूंनीच चालवायच्या असतात, त्याचप्रमाणे साहित्य संस्था देखील साहित्यिकांनाच चालवू द्यायला हव्यात. मात्र विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्यिक नसलेल्यांचा, व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे.

'Save the Sahitya Sangh from politicians and businessmen'; Allegation that the current executive is also ineffective
नागपूर : ज्या प्रमाणे क्रीडा संस्था या खेळाडूंनीच चालवायच्या असतात, त्याचप्रमाणे साहित्य संस्था देखील साहित्यिकांनाच चालवू द्यायला हव्यात. मात्र विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्यिक नसलेल्यांचा, व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. साहित्याशी त्यांचा संबंध नसून राजकीय पाठबळ मिळवून संस्थेची इमारत व मालमत्तेवर त्यांचा डाेळा आहे. त्यामुळे अशा राजकारणी, व्यापाऱ्यांपासून वि. सा. संघाला वाचवा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी केला आहे.
निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या श्रीपाद जाेशी यांच्यासह समर्थक असलेले पीडीकेव्हीचे माजी कुलगुरू डाॅ. शरद निंबाळकर, विनाेद देशमुख, मेघना वाहाेकर, वसंत वाहाेकर, प्रकाश दुलेवाले, विलास देशपांडे आदी उपस्थित हाेते. साेबत अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज केलेले प्रमाेद भुसारी हे देखील उपस्थित हाेते. निवडणुकीत गिरीश गांधी यांनी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पाठींबा असल्याचा प्रचार केला जात आहे. यावरच श्रीपाद जाेशी लक्ष्य करताना दिसले. साहित्य संस्थेच्या निवडणुकीत इतरांनी पडू नये, अशी टीका त्यांनी केली. साहित्य संस्था या सेवाभावी संस्था असून सत्तेची किंवा राजकारणाची केंद्र नव्हेत. साहित्यिकांनी ही संस्था शंभर वर्षापासून टिकवली, वाढवली आहे. यांनी संस्थेसाठी एक थेंबही घाम गाळला नाही, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी वर्तमान कार्यकारिणीवरही कुचकामी असल्याचा आराेप केला. कार्यकारिणीचे काम इमारत, मालमत्ता सांभाळणे नाही, तर वाङ्मयीन सेवा करणे आहे. वर्तमान कार्यकारिणीने वाङ्मयीन सेवेचे काेणतेही काम आपल्या कार्यकाळात केले नाही. अभिजात मराठी भाषेचा विषय, मराठी भाषा, संस्कृती संवर्धनाविषयी त्यांनी कधी भूमिका घेतली नाही, अशी टीका जाेशी यांनी केली. सरकारला भाषाविषयक मार्गदर्शन करण्याची कुवत नसलेले खुजे संस्थेवर कार्यरत असल्याचा गंभीर आराेप त्यांनी यावेळी केला.