खापरखेडा : वारकरी संप्रदायात युवा पिढी तयार हाेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विलास जिल्हारे यांनी खापरखेडा नजीकच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आयाेजित श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी साेहळ्यात केले.
या मंदिरातील संजीवन समाधी साेहळ्याचे यंदाचे ३१ वर्ष हाेय. या साेहळ्यानिमित्त गावात राेज विष्णू सहस्रानाम, काकडा आरती व नगरफेरी, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन यासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले हाेते. याप्रसंगी उमेश्वर बारापात्रे, तीर्थ बारहाते, तुळशीदास धर्माकळ, श्रावण भक्ते, एकनाथ गौळकर, विलास जिल्हारे, सुधाकर वंजार, देवराव वनवे, शंकर निकम यांची कीर्तनेही झाली. रविवारी विलास जिल्हारे यांच्या काल्याच्या कीर्तनाने साेहळ्याची सांगता करण्यात आली. भक्ती, ज्ञान, वैराग्य, संतसाहित्याच्या माध्यमातून धर्माविषयीची शिकवण, बंधूभाव, प्रेम यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. सिल्लेवाडा परिसरातील तरुण वाममार्गाने न जाता त्यांना वारकरी संप्रदायाकडे वळविले पाहिजे, असे आवाहनही करण्यात आले. शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.