स्वर्ण जयंती एक्सप्रेसमध्ये लुटमार झाल्याच्या अफवेने प्रवाशांत खळबळ ; लष्करी जवानाची बॅग लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 22:39 IST2026-02-07T22:38:02+5:302026-02-07T22:39:06+5:30

गाडी आऊटरला थांबल्याने संभ्रम

Rumors of robbery in Swarna Jayanti Express create panic among passengers; Army jawan's bag stolen | स्वर्ण जयंती एक्सप्रेसमध्ये लुटमार झाल्याच्या अफवेने प्रवाशांत खळबळ ; लष्करी जवानाची बॅग लंपास 

स्वर्ण जयंती एक्सप्रेसमध्ये लुटमार झाल्याच्या अफवेने प्रवाशांत खळबळ ; लष्करी जवानाची बॅग लंपास 

नरेश डोंगरे

नागपूर : स्वर्ण जयंती एक्सप्रेसमध्ये लुटमार झाल्याच्या अफवेने आज प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. लष्करी जवानाची बॅग एका चोरट्याने लंपास केल्याने आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्नात हा जवान खाली पडून जखमी झाल्याने लुटमारीची अफवा पसरली होती.

विशाखापट्टनम दिल्ली ही स्वर्ण जयंती एक्सप्रेस आज सकाळी नागपूरला आल्यानंतर तिचा रूट बदलला गेला. ती बल्लारशाह मार्गे जाणार होती. मात्र, सिग्नल न मिळाल्याने ती आउटरला थांबविण्यात आली. या गाडीतून प्रवास करणारे जवान उमा महेश्वर राव (आंध्र प्रदेश) यांची बॅग गाडीतून चोरीला गेली. गाडी उभी असताना एक तरुण खाली उडी टाकून पळाल्याने राव यांना बॅग त्यानेच लंपास केली असावी, असा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला पकडण्यासाठी गाडीतून खाली उडी घेतली. नाल्यासारखा खोलगड भाग असल्याने तोल जाऊन ते पडले आणि त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. 

त्यांच्या मदतीला अन्य प्रवासी धावले. तोपर्यंत गाडीत लुटमार झाल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, माहिती कळताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. ईकडे गाडीत लुटमार झाल्याच्या कथित वृत्ताने दिवसभर विविध अधिकाऱ्यांकडून रेल्वे पोलिसांना विचारणा होऊ लागली. दरम्यान, उमा महेश्वर राव यांच्या तक्रारीवरून इतवारी जीआरपीने बॅग लिफ्टिंगचा गुन्हा दाखल केला.

लुटमार नाहीच : रेल्वे पोलीस

घडलेली घटना गंभीर आहे. आम्ही अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, गाडीत लुटमार किंवा चेन पुलिंग झाली नसल्याची माहिती ईतवारी ठाण्यातील रेल्वे पोलिस निरीक्षक वैशाली शिंदे यांनी दिली.

Web Title : स्वर्ण जयंती एक्सप्रेस में लूट की अफवाह से दहशत; बैग चोरी

Web Summary : स्वर्ण जयंती एक्सप्रेस में लूट की अफवाह फैलने से यात्रियों में दहशत फैल गई। एक सैनिक का बैग चोरी हो गया, और चोर को पकड़ने के प्रयास में वह घायल हो गया। पुलिस ने स्पष्ट किया कि लूट नहीं हुई, सिर्फ बैग चोरी हुआ।

Web Title : Rumor of Looting on Swarna Jayanti Express Causes Panic; Bag Stolen

Web Summary : Panic erupted on the Swarna Jayanti Express after a soldier's bag was stolen. The soldier was injured pursuing the thief, fueling false looting rumors. Police clarified no looting occurred, only a bag theft.