RTMNU Extortion Case : धर्मेश धवनकरांची सक्तीची रजा वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:03 IST2023-01-09T18:01:40+5:302023-01-09T18:03:56+5:30

विद्यापीठाची कारवाई; पुढील आदेशापर्यंत रुजू होता येणार नाही

RTMNU Extortion Case : professor Dharmesh Dhawankar's forced leave extended | RTMNU Extortion Case : धर्मेश धवनकरांची सक्तीची रजा वाढली

RTMNU Extortion Case : धर्मेश धवनकरांची सक्तीची रजा वाढली

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सात विभाग प्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करीत विद्यापीठ प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. ७ जानेवारी रोजी ही मुदत संपली. सोमवारपासून ते रुजू होणार होते; परंतु विद्यापीठ प्रशासनाने नवीन आदेश जारी केले असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत त्यांना रुजू होता येणार नाही.

यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत कळविलेले नाही; मात्र शनिवारी यासंदर्भातील पत्र जारी झाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात विद्यापीठातील सात विभाग प्रमुखांनी कुलगुरूंकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार धवनकर यांनी विभागप्रमुखांना खोट्या तक्रारींची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली. यासंदर्भात सातही विभागप्रमुखांनी एकत्रितपणे कुलगुरूंकडे तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली. सुरुवातीला तीन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ दिली.

गेल्या २८ नोव्हेंबर रोजी धवनकर यांनी नोटिसीला उत्तर दिले; परंतु या उत्तराने प्रशासनाचे समाधान न झाल्याने प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. इंडियन सायन्स काँग्रेस पार पडल्याने धवनकर नियमित रूजू होणार होते; परंतु आता त्यांची सक्तीची रजा आणखी वाढली आहे.

Web Title: RTMNU Extortion Case : professor Dharmesh Dhawankar's forced leave extended