'प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करावे' राज्य सरकारकडे पद्मश्री प्रा. गणपती यादव यांची मागणी
By निशांत वानखेडे | Updated: January 13, 2026 19:26 IST2026-01-13T19:25:20+5:302026-01-13T19:26:42+5:30
Nagpur : आयआयटींसोबत सुसंगत राहण्यासाठी एलआयटीमधील प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती लक्ष्मीनारायण इनोवेशन टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी (लिटू) च्या बाेर्ड ऑफ गव्हर्नन्स चे अध्यक्ष पद्मश्री प्रा. गणपती यादव यांनी दिली.

'Retirement age of professors should be raised to 65 years' Padma Shri Prof. Ganapati Yadav's demand to the state government
नागपूर : आयआयटींसोबत सुसंगत राहण्यासाठी एलआयटीमधील प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती लक्ष्मीनारायण इनोवेशन टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी (लिटू) च्या बाेर्ड ऑफ गव्हर्नन्स चे अध्यक्ष पद्मश्री प्रा. गणपती यादव यांनी दिली. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहून नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास प्रा. यादव यांनी व्यक्त केला.
रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधत एलआयटी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ मंगळवारी वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे उत्साहात पार पडला. यावेळी मॉईल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना, इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च, नवी दिल्लीचे संचालक प्रा. नितीन सेठ, लिटूचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, राज्यपाल नामनिर्देशित सदस्य उत्कर्ष खोपकर, विद्यापीठाचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाराेहादरम्यान ८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या, तसेच शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ५ सुवर्ण आणि ५ रौप्य पदकाने गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रा. गणपती यादव म्हणाले, रिसायकल इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, मॉलिक्युलर सिम्युलेशन आणि डिजिटल ट्विन्स हे भविष्यात संशोधनाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. तंत्रज्ञानातील प्रगतीशिवाय कोणताही देश विकसित होऊ शकत नाही. विकसित भारत २०४७ साकारण्यासाठी नव्या पिढीतील अभियंत्यांनी तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. लिटू ही मध्य भारतातील नाविन्य, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाचे केंद्र ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डाॅ. अतुल वैद्य यांनी सरकार व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने २०२९ पर्यंत परिसरात स्वतःचे दीक्षांत सभागृह उभारण्यात येईल, अशी माहिती दिली. तसेच बायोटेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग, व्यवस्थापन आणि एआयशी संबंधित नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, असेही स्पष्ट केले. आयाेजनात रजिस्ट्रार प्रो. नीरज खटी, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप शेंडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शिल्पा पांडे, तसेच विभाग प्रमुखांनी कार्य केले.
खाण क्षेत्रात विदर्भाचा वाटा ३५ टक्के हाेईल : सक्सेना
अजित कुमार सक्सेना यांनी सांगितले, विदर्भातील मँगनीज पट्टा सध्या देशाच्या एकूण मँगनीज उत्पादनात सुमारे २० टक्के योगदान देत आहे. हे योगदान २०३० पर्यंत वाढून ३५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सतत अपस्किलिंग करणे, शिकण्याची सवय, शिस्त आणि आर्थिक साक्षरता अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
राेहन पटले, फसाह अहमद, जयराम भूआर्या, दीपाली बोकडे, वृषाली यावलकर यांना सुवर्ण
या दीक्षांत समारंभात रसायन अभियांत्रिकी शाखेत राेहन पटले, फसाह ख्वाजा मसरूर अहमद, एमएससी बायोकेमिस्ट्रीमध्ये जयराम भूआर्या, एमएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये दीपाली बोकडे आणि एमएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये वृषाली यावलकर हे विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. याशिवाय पायल कापसे, आदिती बाेंडे, कोमल गुरुनानी, शेख नेहा परवीन मो. वसीम, सोनाली सिंह या विद्यार्थ्यांना रजत पदकाने सन्मानित करण्यात आले.