शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:15 IST2025-10-20T13:13:49+5:302025-10-20T13:15:07+5:30
Nagpur : शिक्षण या शिक्षकांना शालार्थ आयडी जारी केले गेले आहेत; परंतु शालेय शिक्षण विभागाने संबंधित घोटाळ्यामुळे या शालार्थ आयडीच्या वैधतेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Resume salaries stopped due to Shalarth ID scam; High Court orders
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध शाळांमधील शंभरावर शिक्षकांची मागणी मंजूर करून या शिक्षकांचे शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे गेल्या मार्चपासून थांबवलेले वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश विभागीय उपसंचालकांना दिला.
शिक्षण या शिक्षकांना शालार्थ आयडी जारी केले गेले आहेत; परंतु शालेय शिक्षण विभागाने संबंधित घोटाळ्यामुळे या शालार्थ आयडीच्या वैधतेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, या शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले. या कारवाईविरुद्ध शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर न्यायमूर्तिद्वय मुकुलिका जवळकर व राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
दरम्यान, शिक्षकांचे वकील अॅड. पवन देंगे यांनी सरकारच्या कारवाईवर आक्षेप घेतला व ही कारवाई करण्यापूर्वी शिक्षकांना सुनावणीची संधी देण्यात आली नाही, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता शिक्षकांना दिलासा दिला.
वेतनासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत
याचिकाकर्त्या शिक्षकांना संपूर्ण थकीत वेतन अदा करण्यासाठी न्यायालयाने शिक्षण उपसंचालकांना येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे; तसेच शिक्षकांनी शालार्थ आयडी चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असेही सांगितले आणि शिक्षण उपसंचालक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकांमधील मुद्यांवर येत्या ११ नोव्हेंबरपर्यंत लेखी उत्तर मागितले.