लोकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) दराने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे अनिवार्य आहे. पूर्वी या नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत ठरविण्यात आली होती. या नोंदणीला शासनाने मुदतवाढ दिली असून, आता शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पणन मंडळाने रामटेक तालुक्यात तालुका खरेदी-विक्री संघाला धान खरेदी एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. या संघाचे आधीच्या वर्षीच्या कमिशनचे ८० लाख रुपये पणन मंडळाकडे थकीत आहेत. ती रक्कम दिल्याशिवाय आपण खरेदी केंद्र सुरू करणार नाही, अशी भूमिका खरेदी विक्री संघाने घेतल्याने पेच निर्माण झाला होता. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने पेच सुटण्यास थोडी मदत झाली. त्यामुळे खरेदी विक्री संघाने सध्या रामटेक तालुक्यात चार ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या तिढ्यामुळे पणनकडील नोंदणी प्रक्रिया रखडली होती. ती काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली. कमी काळात अधिक नोंदणी करणे शक्य नसल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशान्वये या नोंदणीला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पणन महामंडळाच्या धान खरेदीला सुरुवात कधी? रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महामंडळ या दोन संस्थांच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने धानाची खरेदी करते. त्याअनुषंगाने या दोन्ही संस्थांनी आधी नोंदणी करायला सुरुवात केली. आदिवासी विकास महामंडळाने त्यांच्या तीनपैकी दोन खरेदी केंद्र सुरू करून खरेदीला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी पणन महामंडळाकडे नोंदणी केली आहे. परंतु, त्यांनी अद्यापही खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे त्यांची धान खरेदी नेमकी कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकयांनी उपस्थित केला आहे.
९७५ शेतकऱ्यांची नोंदणी तालुका खरेदी-विक्री संघात आतापर्यंत ९७५ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रोज संघाच्या कार्यालयात गर्दी होत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि गोदामाची समस्या यामुळे धान खरेदी सुरू करण्यास विलंब होत असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शेतकऱ्यांची गर्दी कमी झाली की, धान खरेदी सुरू करण्यात येईल, अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे सचिव प्रशांत बोरकर यांनी दिली.
"आदिवासी विकास महामंडळाने त्यांच्या पवनी व डोंगरी येथील खरेदी केंद्रांवर आतापर्यंत प्रतिक्विंटल २,३०० रुपये ११ शेतकऱ्यांकडून ७१६.८० क्विंटल धान खरेदी केला आहे. या धानाची एकूण किमत १६ लाख ४८ हजार ६४० रुपये आहे."- सुखदेव कोल्हे, सहायक उपनिबंधक, रामटेक