Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:49 IST2025-06-13T09:48:25+5:302025-06-13T09:49:34+5:30
Nagpur Crime: गुटखा न देण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणात दोन मित्रांनी १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला.

Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
गुटखा न देण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणात दोन मित्रांनी १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आर्यन विलास वहिले (वय, १८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आर्यनला ड्रग्जचे व्यसन होते आणि कोणालाही न कळवता घरातून निघून जायचा. घटनेच्या आठ दिवस आधी तो अशाच प्रकारे घरातून बेपत्ता झाला होता. दरम्यान, मंगळवारी एका व्यक्तीने आर्यन हा अजनी पोलीस ठाण्याजवळील फूटपाथवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्याच्या वडिलांना कळवले. त्यानंतर वडिलांनी त्याला घरी आणले, नारळ पाणी दिले आणि झोपवले. पण रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक आर्यनची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली. परंतु, बुधवारी एका तरुणाने आर्यनच्या वडिलांना सांगितले की, ९ जूनला रात्री आर्यनचे राहुल श्याम हजारे (वय, २४) आणि नागेश्वर उर्फ सोनू श्यामराव मसराम (वय, २३) यांच्याशी भांडण झाले. आर्यनने त्यांना गुटखा मागितला. परंतु, त्यांनी नकार दिल्याने हाणामारी झाली. त्यावेळी राहुलने आर्यनवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यानंतर आर्यनच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. तसेच पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये डोक्याला खोल जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निश्चित झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.