खरेच, सैतानाला फाशी होते का...?
By नरेश डोंगरे | Updated: November 23, 2025 22:24 IST2025-11-23T22:23:20+5:302025-11-23T22:24:11+5:30
शांत, अतिशांत असणाऱ्याचेही रक्त खवळवून सोडणाऱ्या या घटना महाराष्ट्रात वारंवार घडतात आहे.

खरेच, सैतानाला फाशी होते का...?
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अंगाखांद्यावर घेऊन त्यांचे लाड-कोड करावे, जिवापाड त्यांना जपावे असे वय असलेल्या, ज्यांना चांगले वाईट, पाप-पुण्य काहीच कळत नाही, अशा निरागस चिमुकल्यांवर सैतानं बलात्कार काय करतात. त्यांची क्रूरपणे हत्या काय करतात, सारेच कसे सून्न करणारे. शांत,अतिशांत असणाऱ्याचेही रक्त खवळवून सोडणाऱ्या या घटना महाराष्ट्रात वारंवार घडतात आहे. शहर, गावं तेवढे बदलतात. सैतानांची नाव अन् चेहरेही बदलतात. त्यांची विकृती अन् क्राैर्य सारखेच असते. दोन दिवसांपूर्वी ते आता नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळ घडले.
अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवरील अत्याचार करून एका सैतानाने तिची क्रूरपणे हत्या केली. या घटनेनंतर केवळ मालेगाव, नाशिक नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र जनाक्रोश असून, या निरागस चिमुकलीला अशा पद्धतीने संपवणाऱ्या सैतानाला फाशी द्या, अशी मागणी होत आहे. ही मागणी आणि हा आक्रोश आणखी काही दिवस असाच राहणार आहे. नंतर मात्र सारे शांत होईल अन् पुन्हा कुण्या शहर,गावात दुसरा कोणता सैतान असेच कृत्य करून एखाद्या चिमुरडीला पुन्हा असेच संपवेल. प्रचंड संतापजनक असले तरी हे वास्तव आहे. कारण महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे काही पहिले प्रकरण नाही.
१७ वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. २००८ मध्ये एका चार वर्षांच्या चिमुलीचे अपहरण करून वसंता दुपारे नामक सैतानाने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या गुन्ह्यासाठी क्रूरकर्मा दुपारेला सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर क्रूरकर्मा दुपारेने पुनर्विलोकन याचिका अन् राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तोसुद्धा फेटाळण्यात आला होता. मात्र, या सैतानाला अजूनपर्यंत फासावर टांगण्यात आलेले नाही.
६ डिसेंबर २०१९ रोजी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावाच्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे संजय देव पुरी या क्रूरकर्म्याने अपहरण केले. तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घूणपणे हत्या केली आणि तिचे शव शेतात लपवून ठेवले. सत्र न्यायालयाने या सैतानाला जून २०२४ मध्ये तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. एखाद्या प्रकरणात तिहेरी फाशी सुनावली जाण्याची महाराष्ट्रातील कदाचित ही पहिलीच घटना असावी, म्हणून सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, अजूनदेखिल या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही.
मालेगावच्या प्रकरणातही न्यायालयाकडून कदाचित या सैतानाला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. मात्र, त्या शिक्षेची अंमलबजावणी कधी होईल, हे सांगता येणार नाही. आमच्याकडे तशी काही व्यवस्थाच नाही. राष्ट्रपतीकडून दयेचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर आरोपीला लगेच फासावर टांगले जावे, ही माफक अपेक्षा आहे. मात्र, वसंता दुपारे नामक सैतानाच्या बाबतीत ही अपेक्षाही अधांतरी लटकवल्याचे दिसून येते. त्यामुळे आक्रोश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न पडला आहे की ... खरेच, सैतानाला फाशी होते का ?