प्रकाशाच्या सणात उमजलेली आशेची किरणे ; प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनी तयार केल्या आकर्षक पणत्या
By सुमेध वाघमार | Updated: October 17, 2025 18:10 IST2025-10-17T18:03:54+5:302025-10-17T18:10:22+5:30
Nagpur : वैद्यकीय उपचारांनी बरे झालेल्या रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'उडाण' प्रकल्पाने या दिवाळीत समाजासमोर एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी सादर केली आहे.

Rays of hope shine in the festival of lights; Attractive lanterns created by patients of the regional psychiatric hospital
नागपूर : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, सृजनशीलतेचा सण. आणि याच दिवाळीत काही खास दिवे फक्त प्रकाशासाठी नव्हे, तर आशेचा नवा झगमगता किरण घेऊन आले आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयातील 'उडाण' प्रकल्पातून तयार झालेले हे दिवे बरे झालेल्या मनोरुग्णांच्या कलेचे सुंदर प्रतीक ठरले आहेत.
वैद्यकीय उपचारांनी बरे झालेल्या रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'उडाण' प्रकल्पाने या दिवाळीत समाजासमोर एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी सादर केली आहे. रुग्णांनी स्वत: रंगवलेल्या आणि सजवलेल्या सुमारे १७०० आकर्षक पणत्या या वर्षी तयार करण्यात आल्या असून, त्यापैकी ११३० पणत्यांची यशस्वी विक्रीही झाली आहे. विशेष म्हणजे काही पणत्या अमेरिकेपर्यंत पोहोचल्या, हे या उपक्रमाचे अनोखे यश आहे.
कलेतून साकारले आत्मभान
प्रादेशिक मनोरुग्णालयातील ‘उडाण’ प्रकल्पांतर्गत चालवले जाणारे डे-केअर केंद्र हे बºयाचशा रुग्णांसाठी नवजीवनाचे दार ठरत आहे. येथे शिवणकाम, झाडू, पत्रावळी, ज्वेलरी, शेती कौशल्य यांसह पणत्या सजावटीचे प्रशिक्षण दिले जाते. हे केवळ हसत-खेळत शिकवले जात नाही, तर रुग्णांच्या आत्मविश्वासातही भर घालते. ही पणत्या अॅक्रेलिक आणि आॅईल पेंटसह सजवून अगदी साध्या शैलीत, पण मनाला भिडणाºया सौंदर्याने रंगवल्या जातात.
समाजाच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल
या रुग्णांनी साकारलेल्या पणत्या केवळ एखाद्या कलाकृतीसारख्या नाहीत, तर त्या त्यांच्या जिद्दीची, उपचारांनंतरच्या प्रवासाची आणि पुन्हा उभे राहण्याच्या इच्छाशक्तीची ओळख आहे. समाजानेही या पणत्यांची दखल घेत, त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत यामध्ये आपला वाटा उचलला आहे. हे सामाजिक जाणिवेचे उदाहरण ठरते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमने यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक उपचार तज्ज्ञ डॉ. रीना खुरपुडी, ‘उडाण’ प्रकल्प डे-केअर समन्वयक प्रिया सोनवणे तसेच सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्विरीत्या राबविण्यात आला आहे.
पुनर्वसनाचा प्रकाशमय मार्ग
"हा प्रकल्प केवळ व्यवसायोपयोगी शिक्षण देत नाही, तर या रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक ठोस पाऊल टाकतो आहे. मानसिक आजारातून बरे झाल्यावर अनेकांना सामाजिक स्वीकार, आर्थिक स्वावलंबनाची चिंता भेडसावत असते ‘उडाण’ प्रकल्प त्यावर विश्वासाने आणि संवेदनशीलतेने उत्तर देतो आहे."
-डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय