Rains : ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात बरसणार ! विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जाेरदार पावसाची शक्यता, पुढील पाच दिवस 'ह्या' जिल्ह्यांना बसेल फटका
By निशांत वानखेडे | Updated: October 25, 2025 18:50 IST2025-10-25T18:48:59+5:302025-10-25T18:50:30+5:30
महाराष्ट्रातही आठवडाभर पावसाची शक्यता : वातावरणात गारवा वाढला

Rains will continue in the state till October 31! Heavy rains likely in most districts of Vidarbha, 'these' districts will be hit for the next five days
Vidarbha Rain :विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुनरागमन केले आहे. शनिवारी नागपूरकरांची सकाळच पावसाने सुरू झाली. बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्या प्रभावाने पूर्व व पश्चिम विदर्भातील अर्ध्याअधिक जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातही सुरू असलेल्या हालचालीमुळे उर्वरित महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले असून पावसाचे सत्र आठवडाभर चालेल, अशी शक्यता आहे.
शुक्रवारी रात्रीपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लागली. भंडारा जिल्ह्यात मुसळधार बरसला. येथे सकाळपर्यंत तब्बल ४५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. अकाेल्यातही रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून सकाळपर्यंत १०.७ मि.मी. पाऊस बरसला. जिल्ह्यात शनिवारीही दिवसभर मध्यम पावसाच्या सरी सुरू हाेत्या. नागपुरातही सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे दिवसभर नागपूरकरांना अनिश्चिततेचा सामना करावा लागला. नागपूर हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार नागपूरसह भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकाेला, चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरींची बरसात हाेण्याची शक्यता आहे. हे सत्र पुढचे चार-पाच दिवस चालण्याचीही शक्यता विभागाने वर्तवली आहे.
आज पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैरूत्य दिशेला ४०० किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमणाची शक्यता जाणवते. यामुळे पुढील सात दिवस म्हणजे ३१ ऑक्टोबर पर्यन्त मुंबई सह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देशात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
दुसरीकडे आग्नेय बंगालच्या उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे रविवारी मध्य बंगालच्या उपसागाराकडे मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर व २६ तारखेला चक्रीवादळ व २८ तारखेला तीव्रचक्रीवादळात रूपांतर होण्याच्या शक्ययेमुळे दक्षिण भारताबरोबर विदर्भातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.