पावसाचा कहर, घरांचे बनले तळे ;पिपरीतील नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:31 IST2025-08-16T16:31:13+5:302025-08-16T16:31:56+5:30
पिपरी येथील प्रकार : पाणी निचऱ्याच्या सोयीचा अभाव

Rain wreaks havoc, houses become ponds; citizens of Pipri are shocked
लोकमत न्यूज नेटवर्क
मौदा : तालुक्यातील पिपरी व परिसरात बुधवारी (दि. १३) दुपारी जोरदार पाऊस बरसला. पावसाचे पाणी वाहन जाण्याची प्रभावी सुविधा करण्यात न आल्याने पावसाचे पाणी रस्ता व गावालगतच्या ले-आउटमध्ये तुंबले आणि ते नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे त्या घरांसोबतच परिसरात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. घरांमधील साहित्य भिजल्याने त्यांचे नुकसानही झाले. ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र हा प्रकार गंभीर्याने घेतला नाही, असा आरोप या नागरिकांनी केला आहे.
लोकसंख्या वाढत असल्याने पिपरी येथे गावालगतच्या शेतात ले-आउट तयार करण्यात आले असून, त्यातील भूखंडांवर सात जणांनी त्यांच्या घरांचे बांधकाम करून त्यात राहायला सुरुवात केली. या ले-आउटमध्ये वीज व पाणीपुरवठ्याचे नळ देण्यात आले असून, सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. पाणी वाहून जाण्याची सुविधा नसल्याने पावसाचे पाणी ले-आउटमध्ये तुंबते आणि ते लगतच्या गावातील जुन्या वस्तीत असलेल्या घरांमध्ये शिरते. हाच प्रकार बुधवारी दुपारी घडला.
पावसाचे पाणी आधी ले-आउटमध्ये व नंतर रस्त्यावर तुंबल्याने जुन्या वस्तीतील सात जणांच्या घरांमध्ये तर ले-आउटमधील घरांच्या अंगणात पाणी शिरले होते. त्यामुळे एकीकडे रामकृष्ण चरडे, केशव काशीराम वैद्य, खुशाल वैद्य, कंठीराम वैद्य यांच्यासह इतरांची तारांबळ उडाली. दुसरीकडे, त्यांच्या घरांमधील धान्य व गृहोपयोगी साहित्य भिजल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले.
घरांमधील पाणी बाहेर काढून आत झालेला चिखल साफ करताना त्यांच्या नाकीनऊ आले. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या भागात तांत्रिकदृष्ट्या योग्य नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भिंत पडली, धान्य भिजले
या ले-आउटमधील तुंबलेले पाणी घरात शिरल्याने धान्य व साहित्य भिजले. त्यामुळे आपण ग्रामपंचायत अधिकारी संतोष चोपकर यांना फोनवर माहिती दिली. त्यावर त्यांनी 'मी काय करू, तुमच्या तुम्ही पाहा, ते काम आमचं नाही' असे उत्तर दिल्याचे कंठीराम वैद्य व ओमप्रकाश चरडे सांनी सांगितले. पाण्यामुळे धान्य खराब झाले असून, घराची भिंती कोसळली. हा प्रकार आपण सरपंच रमेश चरडे यांना सांगितला असता, त्यांनी 'मी मौदा येथे आहे. तलाठ्याला सांगा' असे उत्तर दिल्याचे खुशाल वैद्य यांनी सांगितले. या दोन्ही व्यक्तींशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था
- ले-आउट तयार होण्यापूर्वी ही समस्या १ उद्भवत नव्हती. गावातील पावसाचे पाणी त्या शेतातून सरळ वाहून जात होते. त्या ले-आउटवर पाच ते सहा वर्षांपासून घरांचे बांधकाम सुरू झाले. तेव्हापासून ही समस्या निर्माण व्हायला लागली. पूर्वी तिथे पाणी तुंबल्यास ग्रामपंचायत प्रशासन लगेच उपाययोजना करून त्या पाण्याला मार्ग काढून द्यायचे. त्यामुळे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत नव्हते.
- यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला वारंवार फोन करून ही समस्या सांगण्यात आली. मात्र, त्यांनी सुरुवातीला असंबद्ध उत्तरे दिली व नंतर फोन घेणे बंद केले. सरपंचाने मात्र आपण बाहेर असून, 'तुमच्या घरात पाणी शिरले तर मी काय करू' असे उत्तर देऊन फोन बंद करीत जबाबदार झटकली.
"हा विषय ग्रामपंचायतच्या अखत्यारीत असला तरी काही नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. मी या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या प्रकाराची चौकशी करून ही समस्या सोडविली जाईल व नागरिकांना दिलासा दिला जाईल."
- दत्तात्रय निंबाळकर, तहसीलदार, मौदा