Rain : विदर्भात रात्रीपासून सकाळपर्यंत जाेरदार पाऊस ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आंबा, मका, गहु पिकांना फटका
By निशांत वानखेडे | Updated: April 2, 2026 20:23 IST2026-04-02T20:21:54+5:302026-04-02T20:23:18+5:30
Nagpur : पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली व साेबत वादळाचाही तडाखा बसला.

Rain : Heavy rains in Vidarbha from night to morning! Farmers suffer huge losses, mango, maize, wheat crops hit
नागपूर : पूर्व विदर्भातीलनागपूर, वर्धा, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली व साेबत वादळाचाही तडाखा बसला. काही ठिकाणी घरांची पडझड झाली, तर शेतात असलेल्या पिकांचेही नुकसान झाले. पावसाळी वातावरणामुळे तापमानात माेठ्या फरकाने घसरण झाली असून त्रासदायक उन्हापासून दिलासा मिळाला.
वर्धा जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत सर्वाधिक २६.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. अनेक भागांत वादळामुळे काही घरांची पडझड झाली, टिनाची छपरे उडून गेली. काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. पावसामुळे रब्बी हंगामातील गहु व इतर पिकांची हानी झाली. कारंजा तालुक्यात एक पशुधन दगावल्याचीही माहिती आहे. नागपूर शहरात सकाळपर्यंत २० मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळासह पाऊस बरसला. काही भागात काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला.
यासह गडचिराेलीत ९.४, गाेंदिया ३.४ व भंडारा येथे २ मि.मी. पावसाची नाेंद झाली. तिन्ही जिल्ह्यात वादळी पावसाचा पिकांना फटका बसला. विशेषत: आंबा, मका व गव्हाचे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यात जवाहरनगर येथे एका महिलेच्या घरावर चिंचेचे झाड काेसळल्याने घराची पूर्णपणे पडझड झाली. सकाळपर्यंत मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव आणि आंधळगाव मंडळांमध्ये सर्वाधिक १६.३ मिमी पावसाची नोंद झाली. गडचिराेलीत विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह आलेल्या अवकाळीच्या वादळाने झोडपले. गडचिरोली तालुक्यातील वीज पुरवठा सुमारे एक ते दीड तास खंडित झाला होता, ज्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले. गाेंदिया जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मका पीक भुईसपाट झाल्याने जवळपास ४५० हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात, अमरावती, बडनेरा शहरांसह लगतच्या अंजनगाव बारी परिसरात तसेच तिवसा, अचलपूर, वरूड, चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे संत्रा, कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि इतर पिकांसमवेत संत्राबागांची फळधारणेला फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, दारव्हा, केळापूर, महागाव, राळेगाव, पुसद तालुक्यात रात्रीला जोरदार पावसाची नोंद झाली. या तालुक्यामध्ये १७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये गहू, तीळ, ज्वारी, टरबूज या पिकांचा समावेश आहे. याशिवाय भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले. चार जनावरे या पावसात दगावल्याची माहिती आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील काही भागात बुधवारी रात्री रिमझिम पाऊस झाला.
नागपूरला पारा ७.८ अंशाने घसरला, ४ एप्रिलपर्यंत गारवा
दरम्यान पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात माेठ्या फरकाने घसरण झाली. नागपूरचे तापमान ७.८ अंशाने खाली घसरत ३१.४ अंशावर पाेहचले, जे सरासरीपेक्षा ८ अंशाने कमी आहे. भंडारा ७ अंशाने घसरून सर्वात कमी ३१ अंशावर, गाेंदिया ५.५ अंशाने घसरून ३२.६ अंश, वर्धा ३ अंशाने घसरून ३७.५ अंश नाेंदविले गेले. चंद्रपूर, गडचिराेली, अमरावती व इतर जिल्ह्यातही तापमान २ ते ३ अंशाने खाली घसरले. त्यामुळे मार्चपासून सूर्याचा प्रकाेप झेलणाऱ्या नागरिकांना गारव्याचा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४ एप्रिलपर्यंत असेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.