उकाड्यानंतर विदर्भावर पावसाचे ढग ! तीन दिवस 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
By निशांत वानखेडे | Updated: March 11, 2026 19:26 IST2026-03-11T19:24:28+5:302026-03-11T19:26:36+5:30
Nagpur : उन्हाच्या झळांनी हाेरपळणाऱ्या वैदर्भियांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून विदर्भावर पावसाचे ढग दाटणार असून वादळासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे.

Rain clouds over Vidarbha after heatwave! Chance of rain in these districts for three days
नागपूर : उन्हाच्या झळांनी हाेरपळणाऱ्या वैदर्भियांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून विदर्भावर पावसाचे ढग दाटणार असून वादळासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी २४ तास म्हणजे गुरुवारपर्यंत उष्ण लाटांचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या १० दिवसांपासून आंशिक चढउतारासह कमाल तापमान सातत्याने नागरिकांची परीक्षा घेत आहे. बहुतेक जिल्हे उन्हाच्या झळांनी हाेरपळत आहेत. तीन दिवसांपूर्वी देशात उच्चांकीवर गेलेल्या अकाेल्याचा पारा अद्यापही चढलेलाच आहे. बुधवारी ०.३ अंशाच्या आंशिक वाढीसह ४१ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली. जवळच्या अमरावतीतही दिवसाचा पारा ४०.४ अंशावर आहे. ही दाेन्ही शहरे उष्ण लाटेचा सामना करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीचे तापमानही ४० अंशावर गेले आहे. नागपूरच्या तापमानात अंशत: वाढ हाेत ३८.४ अंशाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ३.२ अंशाने अधिक आहे. चंद्रपूर ३८.२ अंशावर आहे. वर्धा, वाशिम, बुलढाणा ३९ अंशाच्या सरासरीत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारपर्यंत दिवसाचा ताप वाढलेलाच राहिल व उष्ण लाटेचाही सामना करावा लागू शकताे.
त्यानंतर १३ मार्चपासून मात्र वातावरणात बदल हाेण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून आकाशात ढग दाटण्याची शक्यता आहे. ३५ ते ५० किमी प्रतितासाच्या वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाळी वातावरणामुळे शनिवार १४ मार्चपासून कमाल तापमानात ३ ते ५ अंशाची घसरण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात उन्हापासून माेठा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.