नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 00:43 IST2019-10-29T00:37:51+5:302019-10-29T00:43:11+5:30
रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले.

नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले. काँग्रेसचे बंटी शेळके यांनी हस्तक्षेप करून ३० ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रोको करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात खासगी ठेकेदाराचे २८६ सफाई कामगार काम करीत आहेत. त्यांचे आर्थिक शोषण करण्यात येत आहे. त्यांना नियमानुसार मजुरी देण्यात येत नाही. दिवाळीत ७,३०० रुपये बोनस देण्याचे आश्वासन देऊनही बोनस देण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे एटीएमही ठेकेदाराने आपल्या ताब्यात घेतले आहे. ठेकेदार एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातील पैसे काढून केवळ कामगारांना ५ ते ६ हजार रुपये देत असल्याचा आरोप आहे. कामगारांचा पीएफ कपात करूनही त्यांना पीएफ क्रमांक देण्यात आला नाही. आरोग्य विमा नसल्यामुळे कामगार आजारी पडल्यानंतर त्यांची गैरसोय होते. त्यांना युनिफॉर्म, मास्क देण्यात येत नसल्यामुळे ते नेहमीच आजारी पडतात. सफाई कामगारांच्या आंदोलनाची माहिती मिळताच काँग्रेसचे बंटी शेळके रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी कामगारांना मिठाई देऊन ‘डीआरएम’ कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केले. स्टेशन संचालक दिनेश नागदेवे यांना भेटून ३० ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला. कामगारांचे शोषण बंद न केल्यास डीआरएम कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेविका नेहा निकोसे, रौनक चौधरी, तौसिफ खान, मोईज शेख, स्वप्निल बावनकर, राकेश निकोसे, अक्षय घाटोळे, सागर चौहान, मन्सूर भाटी, वैभव संभारे, स्वप्निल ढोके, पूजक मदने आणि सफाई कामगार उपस्थित होते.